

मंचर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुका पंचायत समिती १० गणाची निवडणुक आरक्षण सोडत गुरुवार दि २८ रोजी घोडेगाव येथे झाली. आरक्षण सोडतीमुळे अनेक जण खुशीत तर अनेकाच्या निवडणूक लढविण्याच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.
पंचायत समिती आंबेगावचे गणाची आरक्षण सोडत कार्यक्रम तहसिल कार्यालय घोडेगाव येथील सभागृहात पुणे उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे आणि तहसिलदार रमा जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आरक्षण पुढील प्रमाणे : अवसरी बुद्रूक अनुसूचित जमाती महिला, जारकरवाडी अनुसूचित जमाती पुरुष, पिंपळगाव तर्फे महाळूंगे – ओबीसी महिला, चांडोली बुद्रूक नागरिकांचा मागास प्रर्वग पुरुष, सर्वसाधारण महिला प्रर्वगासाठी आरक्षित गण बोरघर, घोडेगाव, पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक, सर्वसाधारण पुरुष गण कळंब, शिनोली, पेठ याप्रमाणे.
आरक्षण सोडत प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, माजी उपसभापती संतोष भोर, घोडेगावच्या सरपंच क्रांतीताई गाढवे, सचिन बांगर, प्रकाश घोलप, इंदुबाई लोहकरे, रुपाली जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. आरक्षण चिठ्ठी घोडेगाव न्यू इंग्लिश माध्यमाच्या आश्रम शाळेची विद्यार्थिनी चैत्राली पारधी आणि प्राची ठोसर यांच्या हस्ते काढण्यात आली .