

वेल्हे : दत्तात्रय नलावडे: सुटीच्या व इतर दिवशी हजारो पर्यटकांची वर्दळ असलेल्या सिंहगड किल्ल्याचे उन्मळलेले धोकादायक डोंगरकडे, तटबंदीचे बुरूज तसेच घाटरस्त्याच्या दरडींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. धोकादायक कडे, तटबंदी, दरडींच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी (दि. 25) कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ कोसळलेल्या कड्याच्या दरडीखाली चिरडून पुण्यातील निष्णात गिर्यारोहक हेमंग धीरज गोला (वय 31) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी सुदैवाने काही पर्यटकांसह कल्याण दरवाजा पाऊलवाटेने ये-जा करणार्या विक्रेत्यांचे प्राण सुदैवाने वाचले. कड्याच्या मोठ्या दरडी, राड्यारोड्याखाली गडावरून कल्याण गाव व वाड्या-वस्त्यांत जाणारा पायी मार्ग बंद झाला आहे. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत कड्याच्या दरडीचे अवशेष कोसळले आहेत. इतके भयानक चित्र आहे.
हवेली तालुका तहसीलदार तृप्ती कोलते पाटील म्हणाल्या की, सिंहगड किल्ल्याच्या दरडी, कडे, तटबंदी अशा ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेला कळविण्यात येणार आहे. पावसाळ्यात गडाचे डोंगरकडे, तटबंदी, बुरुजाच्या दरडी उन्मळून कोसळण्याचा धोका असल्याने युद्धपातळीवर आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे म्हणाले की, पावसाळ्यात संभाव्य धोकादायक दरडी संरक्षित करण्यात याव्यात तसेच गडासभोवतालच्या कडे, तटबंदीच्या धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात. पुणे (भांबुर्डा), वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले की, कडा कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. गडाच्या कडेकपार्या, तटबंदी, जंगल अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध केला आहे. पावसाळ्यात डोंगर, बुरुजाच्या दरडी उन्मळून कोसळण्याचा धोका आहे. अशा ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत.
सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडलाधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, सुरक्षारक्षक नितीन गोळे, रमेश खामकर, तानाजी खाटपे, राहुल मुजुमले आदी सुरक्षारक्षकांनी किल्ल्यासभोवतालचे धोकादायक कडे, दरडी, घाटरस्त्याच्या दरडीची पाहणी सुरू केली आहे. वनपरिमंडलाधिकारी लटके म्हणाले की, घाटरस्त्याच्या मोर माच, जगताप माच तसेच इतर ठिकाणी असलेल्या दरडीच्या ठिकाणी तसेच गडाचा कल्याण दरवाजा, पश्चिमेकडील तटबंदी आदी ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून गडावर देशविदेशातील पर्यटक, शिवभक्तांची वर्दळ वाढली आहे. ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेला घाटरस्ता वाहतुकीला अपुरा पडत असल्याने घाटरस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. तेव्हापासून घाटरस्त्यावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले. बहुतेक धोकादायक दरडी लोखंडी जाळ्या बसवून संरक्षित करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अद्यापही काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. तसेच कल्याण दरवाजा, पश्चिम कडा, वाहनतळ, खांदकडा, दूरदर्शन बुरुजासह अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका आहे.