मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांना अश्रू अनावर | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांना अश्रू अनावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापुरातील अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काय होणार याची उत्सुकता ताणली गेली असतानाच उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच सामान्य शिवसैनिकांना विश्वासाने मंत्रिपद दिले ते मला सोडून गेले आणि ज्यांना काहीच दिले नाही असे शिवसैनिक येऊन मी तुमच्या पाठीशी आहे, असे ठामपणे सांगतात. हे ऐकून आनंद होत असल्याचे ठाकरे यांनी सांगताच शिवसैनिक गहिवरले.

शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचल्याचे पुण्य काम केल्याचा आनंद साजरा करा, असे सांगत आपण मुख्यमंत्रिपदाचा तसेच विधानपरिषद सदस्यपदाचा राजीनामा देणार, असे जाहीर करताच शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. कोल्हापुरातील मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात गेले. याविरोधात शिवसैनिकांमध्ये असणारा संताप त्यांनी मोर्चा काढून व्यक्त केला. दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button