जेजुरीत वैष्णव शिवभक्तांचा मिलाफ; खंडोबाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांची गर्दी | पुढारी

जेजुरीत वैष्णव शिवभक्तांचा मिलाफ; खंडोबाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांची गर्दी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: लाखो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या जेजुरी (ता. पुरंदर) च्या खंडोबा मंदिरात देवदर्शनासाठी माउलींच्या पालखी सोहळ्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या पालखीस सोहळ्यानिमित्त वैष्णव व शिवभक्तीचा मिलाफ पाहण्यास मिळाला.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीनगरीत रविवारी (दि 26) मुक्कामी विसावला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने वारकरी बांधव जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेत होते. दुपारनंतर ते रात्रीपर्यंत देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली. आळंदी ते पंढरपूर मार्गावर आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक जेजुरीत येतात.

वाटेवरच खंडोबाचे मंदिर असल्याने श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्याची पर्वणी वारकरी बांधवाना मिळते. सासवड ते जेजुरी पायी चालून पुन्हा जेजुरीगडावर कडेपठार गडावर जाऊन भंडार्‍याची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करून भंडारा कपाळी लावून भाविक धन्य होतो. वैष्णव शिवभक्तीचा मिलाफ पिढ्यानपिढ्या येथे सुरू आहे. ज्या भाविकांना जेजुरी गडावर जाऊन खंडोबा देवाचे दर्शन घेता येणे शक्य नाही, हे भाविक जेजुरीच्या रस्त्यावर भंडारा उधळून तो कपाळी लावून देवदर्शन घेत असल्याचे चित्र येथे पाहाण्यास मिळत होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीत मुक्कामी येत असल्याने श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने जेजुरी गडावरील मुख्य मंदिरात व मंदिराला फुलांची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच संपूर्ण गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवसंस्थानच्या वतीने गडावर अन्नदान तसेच पालखी मार्गावर बुंदीचा प्रसाद वाटण्यात आला.

हेही वाचा

नगर : सीना- खारोळी नदीला महापूर; बंधारे तुडूंब

चिखली येथील मुलीचे अपहरण

पालखीसाठी बारामतीत 800 शौचालये

Back to top button