सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 1264 विविध कार्यकारी विकास सोसायट्यांपैकी केवळ 360 संस्थांमध्येच नियमित कर्जाचा पुरवठा केला जात आहे. जवळपास 900 विकास सोसायट्यांचे वाटप पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सध्या अनिष्ठ तफावतीमध्ये असलेल्या गाव पातळीवरील संस्थांच्या निवडणुका केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठीच सुरू असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लांबलेल्या विविध कार्यकारी विकास सोसायट्याच्या निवडणुका गेल्या काही दिवसापासून सुरू झाल्या आहेत. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या निवडणुका सुरू झाल्या आहेत. एकीकडे विकास सोसायटीच्या माध्यमातून गावात राजकीय वातावरण तापत आहे.
मात्र, एनपीएमधील या विकास सोसायट्या कर्ज वाटप करण्यासाठी कधी सक्षम होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा बँकेने तरी शंभर टक्के वसुली असणार्या संस्थानाच पतपुरवठा करण्याची अट घातली आहे. परंतु जिल्ह्यसातील विकास सोसायट्याकडे शेकडो कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून तशीच आहे. सध्या या विकास सोसायट्याच्या निवडणुका अंतिम टप्प्यात झाल्या आहेत. परंतु थकबाकी वसुलीचा पेच सध्या या संस्थापुढे निर्माण झाला आहे.
गाव पातळीवरील विकास सोसायटी कर्ज पुरवठा करीत नसली तरी निवडणुकीमध्ये केवळ आपला गट सक्षम राहावा या उद्देशाने या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या विकास सोसायट्याच्या निवडणुका केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे गावातील राजकारण तापले आहे. काही गाव पातळीवरील विकास सोसायट्या बिनविरोधदेखील होत आहेत. मात्र आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय मंडळीकडून व्ह्युवरचना आखली जात आहे.
मतदानाच्या अधिकारासाठी प्रतिष्ठा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकामध्ये विकास सोसायटीच्या सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळीनी विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
थकबाकी भरणार कोण?
विकास सोसायटीकडे शेकडो कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी ठराविक राजकीय पुढार्यांनी आपल्या स्वार्थासाठी घेतली आहे. त्यामुळे काही राजकीय स्वार्थापुढे सर्वसामान्य व नवीन शेतकर्यांना कर्ज मिळणे कठीण झाले आहे.