महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कोसळू शकते. केंद्रीय सुरक्षा दले सज्ज ठेवा | पुढारी

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कोसळू शकते. केंद्रीय सुरक्षा दले सज्ज ठेवा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनावर परतले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते परतल्याने आता शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या, अशी मागणी राज्यपालांकडे केली जाऊ शकते.

मुंबई : राज्यपालांनी केंद्राला लिहिलेल्या पत्राचा परिणाम असा की, रविवारपासून 16 बंडखोर आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले. चांदिवली मतदार संघाचे आमदार दिलीप लांडे यांच्या निवासस्थानाबाहेर सीआरपी आणि राज्य राखीव पोलीस यांच्यासोबतच मुंबई पोलिस अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गेले दोन दिवस शिवसैनिकांनी लांडे यांच्या छायाचित्रांना, बॅनर्सना आणि कार्यालयावरील फलकांना काळे फासले. आता त्यांचे घर आणि कार्यालयाला पोलीस छावणी चे स्वरूप आले आहे.

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कोसळू शकते. केंद्रीय सुरक्षा दले सज्ज ठेवा, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्‍ला यांना पाठवले. पाठोपाठ रविवारपासून 16 बंडखोर आमदारांच्या घरांवर केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनातदेखील झाले.

बंडखोरांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेनेचे नेतेही चिथावणीखोर वक्‍तव्ये करत आहेत. त्यात नेहमीप्रमाणे प्रवक्‍ते संजय राऊत आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आघाडीवर दिसतात. परिणामी, बंडखोरांच्या मतदारसंघांत शिवसैनिकांची आंदोलने सुरू आहेत. या सर्व प्रकाराची दखल घेत राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी दवाखान्यातूनच केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिले.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्‍त सचिव गृह ए. एन. लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्‍त संजय पांडे यांना पत्र पाठवून आमदारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्‍त केली होती. या सर्व आमदारांना पुरेसे संरक्षण द्या, असे आदेश राज्यपालांनी दिले होते. विशेष म्हणजे कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढलेले नाही, असा खुलासा लगेच गृह खात्याने केला आणि शनिवारीच सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबांनाही संरक्षण देण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला.

दुसरीकडे शिवसैनिकांची आंदोलने सुरूच राहिली आणि राज्यपालांनी मग थेट केंद्रीय गृह सचिवांनाच पत्र पाठवून कायदा व सुव्यवस्था ढासळलीच तर केंद्राची सुरक्षा दले सज्ज ठेवा, असा निरोप दिला. आमदारांना पुरेसे संरक्षण देण्याची सूचना आपण राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून केली आहे. या पत्रानंतरही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि अनेक आमदारांची कार्यालये आणि घरे आंदोलकांनी फोडली, असे राज्यपालांनी केंद्राला पाठवलेल्या या पत्रात नमूद केले आहे.

नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या तळावर केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत. आवश्यकता भासल्यास त्या तैनात केल्या जावू शकतात.

Back to top button