

दौंड : पुढारी वृत्तसेवा: दौंड नगरपालिकेने आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता नुकत्याच मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. परंतु, या मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका व गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दौंड नगरपालिका हद्दीत रेल्वे हद्दीतील नागरिकांची नावे समाविष्ट झाली आहेत. वास्तविक, येथील नागरिकांना नगरपालिका हद्दीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. ही मतदार यादी 2021 जनगणनेनुसार तयार केल्याचे दौंड नगरपालिका प्रशासनाने सांगितले. मागील दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील याद्यांचा सावळागोंधळ होताच.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही उमेदवारांनी नगरपालिका हद्दीत राहत नसताना रेल्वे हद्दीत राहून निवडणूक देखील लढवली होती. परंतु, सुस्त पडलेल्या नगरपालिका प्रशासनाने याची कोणतीही शहानिशा केली नाही. दौंड नगरपालिका प्रशासनाने जो सर्व्हे केला, तो चुकीचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ज्यांनी हा सर्व प्रकार केला, त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल दौंडकर नागरिक आता करीत आहेत. मतदार यादीवर हरकत घ्यायची असल्यास सोमवार (दि. 27) हा अखेरचा दिवस असल्याने प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा