

नागज : पुढारी वृत्तसेवा पावसाने ओढ दिल्याने कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांची चिंता वाढली आहे. गतवर्षी अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या बळीराजावर पुन्हा नवे संकट ओढवले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्वभागात खरीप हंगामाच्या पेरणीला अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. मे अखेरीस झालेल्या पावसाने शेतकर्यांनी मशागती करून घेतल्या.
जूनच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला.आणखी पाऊस पडेल, या आशेवर बर्यापैकी शेतकर्यांनी पेरणी करून घेतल्या. त्यामुळे पुरेसा पाऊस नसताना देखील या भागात 40 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पण पावसाअभावी थोड्याफार ओलीवर उगवलेली पिके आता कोमेजू लागली आहेत. गतवर्षी अवकाळी पावसाने डाळिंब व द्राक्षबागांची पुरती वाट लागली. त्यामुळे बागायतदार शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. खरीप हंगामात पाऊस पडेल व चांगले उत्पन्न निघेल ही एक आशा शेतकर्यांना होती, पण ती आशाही आता दुरापास्त वाटू लागली असल्याचेच चित्र आहे.