वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: प्राथमिक शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना राज्यातील अतिमागास वेल्हे तालुक्यात गडगंज पगार घेणार्या कामचुकार शिक्षकांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचे वास्तव्य नवीन शैक्षणिक वर्षात पुढे आले आहे. तालुक्यातील तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या खोपडेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांअभावी बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खोपडेवाडी ही आदिवासी महादेव समाजाची वाडी आहे.
आदिवासी महादेव कोळी समाजाचे 14 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कामचुकार शिक्षकांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कोरोना संसर्गापासून सुरू असलेला खेळखंडोबा अद्यापही सुरू आहे. याबाबत येथील आदिवासींनी वेल्हे तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तातडीने दुसर्या शाळेच्या शिक्षकांना खोपडेवाडी शाळेवर पाठविण्यात आले. ते शिक्षकही शुक्रवारी (दि. 24) सकाळी दहा वाजता आले नाहीत. विद्यार्थी बंद शाळेबाहेर बसले होते. दुपारी पावणेबारा वाजता धावपळ करीत एक शिक्षक आले.
ऑगस्ट 2019 पासून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी शाळा बंदच होती. नवीन शैक्षणिक वर्षातही दोन्ही शिक्षक गायब झाल्याने पहिले दोन दिवस शाळा बंदच होती.
– राजेंद्र जोरकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, खोपडेवाडी
खोपडेवाडी शाळेच्या दोन्ही कामचुकार शिक्षकांवर शासन आदेशानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हंगामी शिक्षक शाळेवर नियुक्त करण्यात आला आहे. शाळा पहिल्या दिवसापासून सुरू आहे.
– कमलाकर म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, वेल्हे
हेही वाचा