सांगवीत पावसाची ओढ; पेरणी केलेल्या शेताला द्यावे लागतेय विहिरीचे पाणी | पुढारी

सांगवीत पावसाची ओढ; पेरणी केलेल्या शेताला द्यावे लागतेय विहिरीचे पाणी

सांगवी : पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना संपत आला तरी बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात जोरदार पाऊस झाला नाही. जून 2018 मध्ये चार वर्षांपूर्वी जुलै महिना संपला तरी पाऊस झाला नव्हता. तीच परिस्थिती यंदा चार वर्षांनंतर दिसून येते आहे. समाधानकारक पाऊस न पडल्याने पेरणी केलेल्या शेताला विहिरीच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. पाऊस नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सांगवी व परिसरात यंदा मान्सूनपूर्व मोठ्या पावसाची अपेक्षा होती.

परंतु पावसाने पाठ फिरवली. आता जून महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र जून संपत आला तरी पाऊस बरसेना. या भागात दररोज आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात, परंतु कुठेतरी रिमझिम शिडकावा होत आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या भागातील बहुतांश शेती निरा डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु या भागात मागील काही दिवसांपूर्वी कालव्याचे आवर्तन येऊन गेले आहे.

कालव्यावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांना पावसाच्या ओलीशिवाय सोयाबीन व इतर पिके घेणे अशक्य आहे. ज्या शेतकर्‍यांना मुबलक शेती व विहिरीच्या पाण्याची सोय आहे, त्या शेतकर्‍यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे. हे शेतकरी कोरड्या शेतात बियाणे टोपण करून विहिरीच्या पाण्याने शेत भिजवत आहेत. तसेच माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून ऊस लागवड नियोजनानुसार 15 जुलैच्या पार्श्वभूमीवर उसाच्या लागवडी करत आहेत. यंदाही समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वच गोष्टींवर परिणाम होऊ लागला असल्याने शेतकर्‍यांना कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा

गुन्हेगारी उखडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे; सुदर्शन पाटील यांचे आवाहन

मंचर नगरपंचायत मतदार यादीत नावांचा सावळागोंधळ

राहुरी : विद्यार्थ्यांंमध्ये पेटंट संस्कृती आणणे गरजेचे : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

Back to top button