पालिका निवडणुकीसाठी आता एकूण मतदार साडेचौतीस लाख | पुढारी

पालिका निवडणुकीसाठी आता एकूण मतदार साडेचौतीस लाख

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप यादीनुसार एकूण मतदार संख्या 34 लाख 58 हजार 714 असून, ही संख्या 2017 च्या तुलनेत 8 लाख 23 हजार 916 ने वाढली आहे. सर्वाधिक 1 लाख 3 हजार 959 मतदार प्रभाग क्रमांक 54 (धायरी-आंबेगाव) मध्ये, तर सर्वांत कमी 34 हजार 80 मतदार प्रभाग क्रमांक 24 (मगरपट्टा-साधना विद्यालय) मध्ये आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 58 प्रभागांसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

यानंतर राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. दरम्यान, 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. महापालिकेच्या https://www.pmc.gov.in या संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयात प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. ती पाहून मतदारांनी पडताळणी करावी आणि काही हरकत असेल तर ती नोंदवावी, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी केले आहे. प्रारूप मतदार यादीतील त्रुटीबाबत बिनवडे म्हणाले, ‘या प्रकारच्या त्रुटी दूर करून बिनचूक मतदार यादी तयार करण्यासाठीच हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.’

आकडे काय सांगतात ?
एकूण मतदार : 34 लाख 58 हजार 714
पुरुष मतदार : 18 लाख 7 हजार 663
महिला मतदार : 16 लाख 50 हजार 807
इतर मतदार : 244
पाच वर्षांतील वाढ ः 8 लाख 23 हजार 916
पुरुष मतदारवाढ ः 4 लाख 49 हजार 697
महिला मतदारवाढ ः3 लाख 74 हजार042
इतर मतदारवाढ ः 177
सर्वाधिक मतदारसंख्या ः प्रभाग 54
(धायरी-आंबेगाव) 1 लाख 3 हजार 959
सर्वांत कमी मतदारसंख्या ः प्रभाग 24
(मगरपट्टा-साधना विद्यालय) 34 हजार 80

येथे नोंदविता येणार हरकत
नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून काही त्रुटी असल्यास हरकत नोंदवावी. ही हरकत लेखी किंवा ऑनलाइन स्वरूपात महापालिकेच्या मुख्य निवडणूक कार्यालयात, क्षेत्रीय कार्यालयात तसेच शश्रशलींळेपर्ऽिीपशलेीिेीरींळेप.ेीस या ई-मेलवर नोंदविता येणार आहे.

हरकत नोंदविल्यानंतरची प्रक्रिया कशी होणार?
मतदाराने नोंदविलेली हरकत निवडणूक कार्यालयाकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. या हरकतीची पडताळणी करण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. या पथकामध्ये क्षेत्रीय अधिकारी, अभियंता, लिपिक यांचा समावेश असेल. हे पथक प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन हरकतीची पडताळणी आणि कार्यवाही करून दुरुस्ती करणार आहे.

सहा प्रभागांत महिला मतदारांची संख्या जास्त
प्रारूप मतदार यादीनुसार प्रभाग क्रमांक 15 (गोखलेनगर-वडारवाडी), प्रभाग क्रमांक 16 (फर्ग्युसन कॉलेज-एरंडवणे), प्रभाग क्रमांक 17 (शनिवार पेठ-नवी पेठ), प्रभाग क्रमांक 18 (शनिवार वाडा-कसबा पेठ), प्रभाग क्रमांक 19 (छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ), प्रभाग क्रमांक 29 (घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई) या प्रभागांत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघाचे भवितव्य महिला मतदारांच्या हाती आहे. हे सर्व मतदारसंघ शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत.

हेही वाचा

बाळासाहेबांना सामान्य कुटुंबातील शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी हवा होता : दीपक केसरकर

फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहनाची गरज : कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर

धुळ्यात २५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदारासह पंटरवर गुन्हा दाखल

 

Back to top button