धुळ्यात २५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदारासह पंटरवर गुन्हा दाखल | पुढारी

धुळ्यात २५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदारासह पंटरवर गुन्हा दाखल

धुळे , पुढारी वृत्तसेवा : शेत जमीन खरेदीच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी २५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदारासह खासगी पंटरवर धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी तहसिलदार विनायक थविल व खाजगी पंटर संदीप मुसळे या दोघांविरोधात धुळे येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पिंपळनेर येथील तरुणाने मौजी ढोले पाडा येथे नवीन शर्तीच्या शेत जमिनीच्या खरेदीचा व्यवहार सौदा पावती ने केला होता. ही शेतजमीन भोगवटादार यांच्याकडे वर्ग होण्यासाठी त्याने पिंपळनेरच्या अप्पर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. या प्रकरणात तहसीलदार विनायक थविल यांनी या प्रकरणातील सातबारा उतारा व नोंदी सादर केले नसल्याचे कारण दाखवून हे प्रकरण निकाली काढले होते. या संदर्भातील चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी तहसीलदार थवील यांनी त्या तरुणाकडे तडजोड करत 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच ही रक्कम पंटर संदीप मुसळे याच्याकडे देण्यास सांगितले.

याबाबत त्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने याबाबत पडताळणी करून सापळा रचला. परंतु यांची कुणकुण लागल्याने तहसीलदार आणि खाजगी पंटर यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी 25 हजाराच्या लाचेची मागणी केल्याची बाब निदर्शनास आल्याने या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांच्यावर धुळे येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण, तसेच राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे भूषण खलानेकर यांनी केली.

Back to top button