

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (दि. 26) मुक्कामी येत आहे. यंदा जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाच्या परिसरात नव्याने पालखीतळ निर्माण
करण्यात आला आहे. या पालखीतळावर युद्धपातळीवर विकासकामे राबवून सोहळ्यासाठी हा तळ सज्ज झाला आहे.
जेजुरीत पिढ्यानपिढ्या माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. मात्र या सोहळ्याच्या मुक्कामासाठी कायमस्वरूपी पालखीतळ नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.
यावर्षी नगरपालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाशेजारी नऊ एकर जागेत कायमस्वरूपी पालखी तळाचे नियोजन करण्यात आले आहे. या जागेतील झाडे-झुडपे काढून जागेचे सपाटीकरण करण्यात आले. गेला एक महिना युद्धपातळीवर विविध कामे करून पालखीतळ सुसज्ज करण्यात आला आहे. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने पालखी मैदानावर पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, जंतूनाशक फवारणी, धुरळणी, शौचालये, स्वागत कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या सोहळ्यानिमित्त शहरातही जंतूनाशक फवारणी, धुरळणी व स्वच्छता करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले. इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी बाळासाहेब खोमणे, राजेंद्र गाढवे, नोडल अधिकारी बाळसाहेब बगाडे, स्वामी समर्थ सर्व्हिसेसचे गोपाल मोहरकर, किरण कुदळे तसेच आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज विभागाचे कर्मचारी वारकरी बांधवांना सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
हेही वाचा