जालना : वाढोना शाळेचे पत्रे उडाली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळा भरतेय मंदिरात !

जालना : वाढोना शाळेचे पत्रे उडाली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळा भरतेय मंदिरात !

परतूर, पुढारी वृत्तसेवा ः तालुक्यातील वाढोना येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांवरील पत्रे पहिल्याच वादळी पावसात उडून गेल्याने गावातील मंदिरात शाळा भरत असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश लोखंडे यांनी दिली .वाढोना येथे इयत्ता पाचवी पर्यंत वर्ग असून या शाळेत 90 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.10 जून रोजी रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वारे आल्याने तीन वर्गखोल्या पैकी दोन खोल्यावरील पत्रे उडाली. एक खोलीवर यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेले टॉवर कोसळेले आहे. पत्रे उडण्याची घटना रात्री घडल्याने अनर्थ टळला.

या घटनेला दहा दिवस उलटून गेले असले तरी प्रशासनाला घटनेचे गांभीर्य नसल्याने चिमुकल्यांची शाळा चक्क गावातील मंदिरात भरविण्यात येत आहे. या बाबत मुख्याध्यापक राजेश लोखंडे यांनी पंचनामा करून शाळेच्या खोल्यावरील पत्रे वादळी पावसात उडून गेल्याचे माहिती शिक्षण विभागाला कळविली आहे. या पावसामुळे शालेय अभिलेख भिजून नुकसान झाले असल्याचे समजते. याबाबत शिक्षण विभागाने त्वरित लक्ष न दिल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शैक्षणिक नुकसान

वाढोणा जि.प.ची शाळा मंदिरात भरत असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणावर कमी व येणार्‍या -जाणार्‍यांकडे अधिक जाते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news