

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरात वारकर्यांची पावले पडताच अवघे शहर विठ्ठलमय होऊन गेले. गल्लोगल्ली हरिकीर्तनाचा गजर दिसू लागला. त्यामुळे शहरातील पोलिसदेखील भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यांच्याती भक्तिभाव दाटून आला. दस्तूरखुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्नी व वडिलांसह वारकर्यांना भोजन वाढून त्यांची सेवा केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी विसाव्याच्या ठिकाणी सहकुटुंब दर्शन घेतले.
त्यानंतर वारकर्यांच्या पंगतीला सुरवातीला भोजन वाढले. नंतर स्वतः व कुटुंबीयांनी वारकर्यांसोबत जमिनीवर बसून प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गुप्ता यांचे एक वेगळेच रूप दिसले. जेथे पोलिसांची गरज पडत नाही अशा भावभक्तीच्या अलोट गर्दीत ते हाताची घडी घालून कौतुकाने वारकर्यांशी बोलत होते. त्यांची आस्थेवाईक चौकशी करत होते. यावेळी त्यांचे पोलिस बंदोबस्तावरही जातीने लक्ष होते.
शिस्त पाहून पोलिस आयुक्त भारावले…
एरवी गुन्हेगारी, बंदोबस्त याबाबत पोलिसांवर प्रचंड ताण असतो. मात्र लाखो वारकर्यांची दिंडी पुण्यात येताच पोलिसांवरचा ताण वाढण्याऐवजी हलका झाला. कारण टाळमृदंगाच्या निनादात वारीने त्यांनाही भक्तिमय करून टाकले. कोणालाही शिस्त लावण्याची गरज यावेळी पोलिसांना पडली नाही. वारी आपल्या शिस्तीसाठीच ओळखली जाते. वारकर्यांच्या शिस्तीचे अनोखो दृश्य पाहून पोलिस आयुक्त भारावून गेले.
पोलिसांची 'सोशल वारी' भन्नाट-
पुणे पोलिस दलानेही वारकर्यांच्या सुरक्षेसाठी सर्व जय्यत तयारी केली होती. पालखी आगमनापासून ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांच्या मार्गाची माहिती वेबपेजवर देण्यात येत होती. त्याचवेळी सोशल मीडियावर वारीची क्षणचित्रे व त्याला समपर्क ओळी, अभंग देण्यात येत होते. एरवी सरकारी विभागाची माहिती ही रुक्ष असते. पण, पुणे पोलिसांच्या टि्वटरवरील अभंग व त्यावरील फोटोचे नेटकर्यांनी कौतुक केले. याबाबत पोलिस दलाचे सोशल मीडिया पाहणारे प्रवीण घाडगे यांनी सांगितले की, पोलिस दलाचे सोशल मीडिया हँडल करणारी आमची एक टीम आहे. कोणताही सण, उत्सव असला की आम्ही त्याची अगोदर पूर्ण तयारी करतो.'
हेही वाचा