वारकर्यांचे मोबाईल चोरणार्याला पकडले; पाठलाग करून ठोकल्या बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले आहे. या सोहळ्यादरम्यान मोबाइलची चोरी करणार्या सराईत चोरट्याला युनिट 2 च्या पथकाने पाठलाग करून पकडले. प्रेमराज राजेश पट्टपू (शिंदेवस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याचा साथीदार दीपक ऊर्फ दिप्या (रा. देहूरोड) याच्या मदतीने साधू वासवानी चौकाजवळ वुडलँड हॉटेल येथे मोबाईल हिसकावल्याचे त्याने सांगितले.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न असून, प्रेमराजच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शहरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे. त्याच अनुषंगाने युनिट 2 चे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एकजण संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळले. त्यानंतर चौकशी दरम्यान तो पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडले. अंमलदार शंकर नेवसे, गजानन सोनूने, कादीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पालखी सोहळ्यात सोनसाखळ्यांचीही चोरी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना तीन महिलांच्या सोनसाखळ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचा प्रकार येरवडा येथील इंदिरानगरमधील दत्त मंदिरासमोर बुधवारी दुपारी घडला. याबाबत एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कल्पना शरद गायकवाड (27, रा. मेनलो होम्स सोसायटी, वाघोली) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्यासोबत शालिनी मुसळे, ज्योती रणधीर यांच्या सोनसाखळ्यांची चोरी झाली. एका महिलेने गायकवाड यांची 90 हजारांची, मुसळे यांची 75 हजारांची, तर रणधीर यांची 15 हजारांच्या किमतीची सोनसाखळी चोरून नेली.
हेही वाचा
गोवा : रेल्वेचे खांब घालण्याचे काम बंद पाडले
कोल्हापूर : खतांच्या लिंकिंगने शेतकरी त्रस्त
संत परंपरा प्रत्येक ठिकाणी पोहोचवा; आ. सुनील कांबळे यांचे आवाहन