कोल्हापूर : खतांच्या लिंकिंगने शेतकरी त्रस्त | पुढारी

कोल्हापूर : खतांच्या लिंकिंगने शेतकरी त्रस्त

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खतांची विक्री होते, ही संंधी साधत खत उत्पादक कंपन्यांकडून, कृषी सेवा केंद्रांंना आणि या केंद्रांकडून शेतकर्‍यांना युरिया, पोटॅश या खतांबरोबर अन्य खते माथी मारण्याचे प्रकार वाढत आहे. विशेष म्हणजे यात लिंकिंग आहे, असे समजू नये यासाठी मूळ खताबरोबर जी अन्य खते बळजबरीने दिली जात आहेत तसेच त्या खतांची स्वतंत्र पावती संबंधित शेतकर्‍यांना दिली जाते. मात्र, नको असलेले खत दिले जात असल्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात रेल्वेने तीन हजार टन युरिया कोल्हापुरात आणला आहे; पण या युरियाबरोबर तब्बल सुमारे 60 लाखांची पाच टन अन्य खतेही आली आहेत. आता ही खते मार्केटिंगच्या नावाखाली युरियाबरोबरच शेतकर्‍यांच्या गळ्यात मारली जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रकाराकडे कृषी विभाग लक्ष देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खरिपाच्या तोंडावर नामांकित खत कंपन्यांकडून युरिया, पोटॅश, डी.ए.पी. अशा महत्त्वाच्या खतांवर 400 ते 500 रुपये किमतीची अन्य खतेही दिली जात आहेत. त्यामुळे 1900 रुपयांच्या रासायनिक खताची 45 किलो वजनाची गोणी 2400 रुपयांना पडत आहे. युरियाच्या 45 किलोच्या गोणीचा दर 266 रुपये आहे. युरिया हवा असेल तर नॅनो खत घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना 266 रुपयांना मिळणारी युरियाची गोणी 400 रुपयांना घ्यावी लागत आहे.

पिकांच्या वाढीसाठी शेतकरी युरिया आणि त्याबरोबर पोटॅशही घेत असतो; पण युरियाबरोबर लिंकिंगचा नॅनो युरिया शेतकर्‍यांना घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे सर्व पिकांना शासनाचा शाश्वत हमीभाव नसल्यामुळे बळीराजाची कायमच निराशा होत आहे. त्यातच मार्केटिंगच्या आडून जादा दराचा नॅनो युरिया शेतकर्‍यांच्या माथी मारला जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला येत आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी चार लाख 44 हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, सहा लाख 60 हजार शेतकरी आहेत. जिल्ह्यात मुख्य पीक ऊस घेतले जाते. जिल्ह्यात यंदा भात पिकासह खरिपाचे तीन लाख 63 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा डीएपी, युरिया, इफको खतांची टंचाई होती; पण नवीन युरियाची आवक झाल्याने ही टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

60 लाखांचे लिंकिंग खत

खरिपासाठी जिल्ह्याला तीन हजार टन युरिया कोल्हापुरात आला आहे. यामुळे शेतकर्‍यांना खत मिळणार असले, तरी या युरियाबरोबर तब्बल पाच टनांचे लिंकिंग खत आले आहे.आता हे सुमारे 60 लाखांचे लिंकिंग खत शेतकर्‍यांच्या माथी मारले जाणार असल्याची चर्चा आहे.

Back to top button