संत परंपरा प्रत्येक ठिकाणी पोहोचवा; आ. सुनील कांबळे यांचे आवाहन | पुढारी

संत परंपरा प्रत्येक ठिकाणी पोहोचवा; आ. सुनील कांबळे यांचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत वारकर्‍यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभते. ही सेवा करताना प्रत्येक सेवेकरी भेदाभेद न पाळता वारकर्‍यांची मनोभावे सेवा करून धन्यता मानतो. प्रत्येक सेवेकर्‍याला वाटते, जणू तो पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करतो आहे,’ असे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने दोन वर्षांनंतर नाना पेठेतील मुख्य रस्त्यावर ’संविधान दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ’बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह उपायुक्त वैशाली शिंदे, शाहीर संभाजी भगत आदी मान्यवर उपस्थित होते. या संविधान दिंडीला ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शहा व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार होते. मात्र, राजकीय घडामोडी पाहता त्यांची उपस्थिती नव्हती. कांबळे म्हणाले, ’संविधानाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

त्याचबरोबर वारकर्‍यांनी संत परंपरादेखील प्रत्येक ठिकाणी पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. वारकर्‍यांच्या रूपात पांडुरंगच अवतरला की काय, असा भास येथील वातावरणावरून दिसत आहे.’ बार्टीचे महासंचालक गजभिये यांच्या हस्ते संविधान जलसा सादर करणारे लोकशाहीर संभाजी भगत यांच्यासह इतर कलावंतांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर एकपात्री नाटकातून सामाजिक समरसतेचा संदेश कलावंत उषाताई यांनी दिला.

हेही वाचा

मद्यपी रिक्षाचालकाची पोलिसाला मारहाण

अकोला : बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य पुरात गेले वाहून; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल, कोल्हापुरात चर्चेचा विषय

Back to top button