

जालना, पुढारी वृत्तसेवा ः शहरासह जिल्ह्यात बुधवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जिल्ह्यात जालना शहरासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी पावसाने हजेरी लावली. जालना शहरात बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले.तब्बल दहा दिवसांच्या बे्रक नंतर पडलेल्या या पावसामुळे उकाड्यात काहीशी घट झालीे. आजपर्यंत तालुक्यात 52 मिमी, तर जिल्ह्यात 62.70 मिमी पाऊस पडला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 10 टक्के आहे.
जालना शहरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आकाशात अचानक ढगांची गर्दी होऊन दुपारी 1 वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. पहिल्या सत्रात सुमारे 15 मिनिटे पाऊस पडल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला. शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 97 मिमी पाऊस अपेक्षीत असताना 62.70 मिमी पाऊस पडला आहे. त्यातही पावसाचे प्रमाण विषम असल्याने शेतकरी धास्तावले होते. मात्र, बुधवारी पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. जुना जालना भागात पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामधे प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा असह्य झाला होता. ढगांच्या गडगडाटात पावसाचे आगमन झाल्याने उकाडा कमी होण्यास मदत झाली. जिल्ह्यात आजपर्यंत जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक 86 मीमी तर परतूर तालुक्यात सर्वात कमी 35 मीमी पाऊस पडला आहे. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तीर्थपुरी परिसरात पावसाची हजेरी
तीर्थपुरी, पुढारी वृत्तसेवा ः घनसावंगी : तालुक्यातील तीर्थपुरी परिसरात बुधवारी पावसाने काही काळ हजेरी लावल्याने शेतकर्यांमधे आनंदाचे वातावरण पसरले आहे. तीर्थपुरी परिसरात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या आहेत. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. अनेकांनी कपाशीची लागवड केली असून, पावसामुळे कपाशीला फायदा होणार आहे.