नगर : पाऊस लांबल्याने टँकरची संख्या वाढली | पुढारी

नगर : पाऊस लांबल्याने टँकरची संख्या वाढली

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात मृग नक्षत्राचे एक-दोन पाऊस झाले. आजपर्यंत फक्त 44.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. परंतु दमदार पावसाची नोंद नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली. श्रीगोंदा तालुक्यातील दोन गावे व 16 वाड्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शासकीय टँकरची संख्या कमी पडल्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यातूनही दोन टँकर नगरमध्ये दाखल झाले आहेत.

गेली दोन वर्षे जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे छोटी-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. नद्या, नाले वाहिल्यामुळे गावागावांतील तलावांत देखील मुबलक पाणी साठले होते. त्यामुळे भूजलपातळी देखील राखली गेली. त्यामुळे 2021 मधील उन्हाळ्यात फक्त 10 गावांत पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी 22 टँकर लागले होते.

बेकायदा सावकारी करणार्‍यास अटक; 15 लाख उकळूनही 8 लाखांची मागणी

यंदा देखील भूजलपातळी चांगली होती. नेहमीप्रमाणे संगमनेर, नगर, पारनेर या तालुक्यांतील काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पंधरा दिवसांपूर्वी 22 टँकर सुरू होती. मात्र, रोहिणी कोरडेठाक गेले. मृग नक्षत्राने दोनदा हजेरी लावली. मात्र, दमदार पावसाअभावी संगमनेर, पारनेर, नगर या तालुक्यांतील टंचाई परिस्थिती कायम राहिली. त्यामुळे 22 शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु होता.

यंदा टँकरसाठी ठेकेदार मिळाला नाही. त्यामुळे शासकीय टँकरचा तुटवडा जाणवू लागला. अशा परिस्थितीत पावसाने दडी मारली. त्यामुळे टँकरची संख्या वाढू लागली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातून चार शासकीय टँकर उपलब्ध केले. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देखील टंचाई परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने धुळे जिल्ह्यातून आणखी दोन टँकर उपलब्ध केले. आजमितीस 52 गावे आणि 170 वाड्यावस्त्यांसाठी 30 टँकर धावत आहेत.

टंचाईग्रस्त गावे, वाड्या आणि टँकर संख्या

नगर – 8 – 29 – 5
अकोले – 3 – 17 – 3
पारनेर – 18 – 59 – 4
संगमनेर – 20 – 48 – 13
शेवगाव – 1 – 1 – 1
श्रीगोंदा -2 – 16 – 2

Back to top button