जिल्हा नियंत्रण कक्षातून थेट संवाद; पालखी मार्गाशी राहणार ‘कनेक्ट’ | पुढारी

जिल्हा नियंत्रण कक्षातून थेट संवाद; पालखी मार्गाशी राहणार ‘कनेक्ट’

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 25 आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी 25, जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सासवड तहसील कार्यालय, पालखीतळ सासवड, जेजुरी मंदिर व वाल्हे येथे अशीच व्यवस्था उपलब्ध केली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाशी थेट संवाद साधता येणार आहे. आषाढी पालखी सोहळ्यातील सेवेसाठी तातडीने संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन बिनतारी यंत्रणेची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा आढावाही त्यांनी घेतला.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते. डॉ. देशमुख यांनी नियंत्रण कक्षातून पालखीतळ सासवड आणि सासवड तहसील कार्यालय येथील कक्षाशी संपर्क साधून माहिती घेतली. दिवे घाट, भुलेश्वर व जेजुरी येथे रिपीटर बसविण्यात आले, तर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हवेली, तहसीलदार पुरंदर, तहसीलदार बारामती व तहसीलदार दौंड यांना गाडीमध्ये मोबाईल व्हॅन सेट देण्यात आले आहेत.

यामुळे आवश्यक नियोजनासाठी संवाद सुलभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे व खासगी कंपनीचे व्यवस्थापक नितीन आयनापुरे यांनी आषाढी पालखी सोहळ्यासाठी असलेल्या बिनतारी यंत्रणेबाबत माहिती दिली.

हेही वाचा

नांदेड: काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर, तर भाजपमध्ये उत्साहाला उधाण

नाशिक : कारच्या धडकेने रिक्षातील प्रवासी महिला ठार

नगर : चिंचपूर पांगुळ परिसरात पाऊस

Back to top button