

पुणे : पुढारी वृत्तसेवा: समान पाणी योजनेअंतर्गत शहरातील सोसायट्या आणि व्यावसायिक मिळकतींना पाण्याचे मीटर बसविण्यासाठी थेट पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आवश्यकता भासल्यास विरोध करणार्यांवर थेट गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शहरात तब्बल सोळाशे किमीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 3 लाख 18 हजार पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. या योजनेच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली आहे.
त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत शहरात सुमारे 65 हजार 773 मीटरही बसविले आहेत. अनेक भागांतील सोसायट्यांना पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, मीटर लागल्यामुळे जादा रकमेची बिले येतील, या भीतीपोटी नागरिकांचा विरोध होत आहे. त्यात प्रशासक येण्यापूर्वी थेट नगरसेवकच मीटर बसविण्यास विरोध करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे हे काम रखडले होते.
प्रशासकराज आल्यानंतर प्रशासनाने पुन्हा मीटर बसविण्याच्या कामासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यानुसार विरोध करणार्या सोसायट्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांची मदत घेणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले.
हेही वाचा