

शिरूर : पुढारी वृत्तसेवा: शिरूर पोलिस ठाण्यामधील पोलिस कोठडीत अटकेत असलेल्या घरफोडीतील आरोपीने पोलिस कोठडीतून पलायन केल्याची घटना बुधवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली. रेवण ऊर्फ रोहन ऊर्फ बट्टी बिरू सोनटक्के (वय 23, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे कोठडीतून पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. रेवण सोनटक्के याला शिक्रापूर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक केली होती. त्याची शिरूर पोलिस स्टेशन येथील कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
आरोपी रेवण हा शिरूर पोलिस स्टेशनच्या कोठडीत अटकेत असताना दि. 22 जूनच्या रात्री कोठडीच्या छताची कौले उचकटून पळून गेला. यानंतर हा प्रकार शिरूर पोलिसांच्या सकाळी लक्षात आल्यानंतर तातडीने त्याला शोधण्यासाठी पथके रवाना केली आहेत. रेवणला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अक्षय काळे (रा. चिंचोडी पाटील, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे भेट दिली असून, पोलिसांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.
हेही वाचा