नासा : आकाशात दिसत आहेत पाच ग्रह | पुढारी

नासा : आकाशात दिसत आहेत पाच ग्रह

वॉशिंग्टन : सध्या आकाशाच्या पटलावर पाच ग्रहांचा खेळ रंगला आहे. पहाटेच्या वेळी या पाच ग्रहांच्या चांदण्या लुकलुकत असताना कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवायही पाहता येऊ शकते. बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे पाच ग्रह जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच दिसत आहेत. पूर्व दिशेच्या खालील बाजूपासून ते दक्षिणेत वरच्या बाजूपर्यंत हे पंचग्रह दिसत आहेत. खगोलशास्त्रज्ञ या घटनेला ‘संगम’ (कन्जक्शन) असे म्हणतात.

विशेष म्हणजे हे सर्व ग्रह सूर्यापासूनच्या आपल्या क्रमानुसारच दिसत आहेत. ‘स्काय अँड टेलिस्कोप’ मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2004 नंतर असे दृश्य आकाशात दिसलेले नाही. आकाशात दोन किंवा तीन ग्रह एकत्र दिसणे ही काही फारशी नवलाईची बाब नाही. मात्र, असा पाच ग्रहांचा संगम अनोखा आणि दुर्लभ आहे. ‘नासा’चे संशोधक मित्जी अ‍ॅडम्स् यांनी गेल्या महिन्यातील एका ब्लॉगमध्ये याबाबतची माहिती दिली होती. येणार्‍या काही दिवसांमध्ये तर हे दृश्य अधिकच विलोभनीय होणार आहे. शुक्रवारच्या पहाटे म्हणजे 24 जूनला हे ग्रह पुन्हा एकदा एका रांगेत दिसतील. यावेळी विशेषतः बुध ग्रहाला पाहणे अधिक सोपे व स्पष्ट होईल. सूर्योदयापूर्वी एक तास आधी हे दृश्य अधिक चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकते. सप्टेंबरपर्यंत शुक्र आणि शनी या संगमातून बाहेर जातील.

Back to top button