

पिंपरी: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, चला जाऊ पंढरपुरा, दोन वर्षांपासून पंढरपूरला जाण्यासाठी वाट बघत होतो. अखेर आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार आहोत, असे म्हणत वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाण्यास सज्ज झाले आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (दि. 20) प्रस्थान होत आहे. तब्बल दोन वर्षांनी वारकरी देहूमध्ये जमल्याने देहूनगरी दुमदुमली आहे. भजन, कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाला भेटीसाठी आळवीत आहेत.
अनेक वारकरी पंढरपूरला गेल्यावर फक्त मंदिरच्या कळसाचे दर्शन घेतात आणि पुढल्या वर्षी लवकर येतो, असे पांडुरंगाला सांगून पुढल्या वर्षीच्या वारीची वाट बघतात. दोन वर्षांपासून पांडुरंगाची ओढ असल्याने आता पाऊले चालती पंढरीची वाट, म्हणत कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन घेतो, अशी अवस्था वारकर्यांची झाली आहे.
पावसासोबत हरिनामाचा गजर
अबीर गुलाल.. उधळीत रंग… माझे माहेर पांढरी… नांदुरकी वृक्ष परिसर… अभंगात तल्लीन झालेले वारकरी… आणि पावसाच्या सरींनी साथ दिली… मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या वरुणराजाने अभंगाला साथ दिली. वरुणराजाच्या आगमनाने वारकर्यांमध्ये जोश संचारला. जून महिना अर्धा सरून गेला, तरी पावसाने हजेरी लावली नव्हती.
मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने वारकर्यांनी आनंदाची डोही आनंद तरंग, म्हणत पावसाचे स्वागत केले. टाळ हातात धरून उंच हातांनी आकाशाला अभिवादन केले. रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने वारकर्यांना आनंद झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी दंग झाले होते.
हेही वाचा