सोलापूर : मशिनऐवजी सांगाडा पाठवून साडेआठ लाखांची फसवणूक | पुढारी

सोलापूर : मशिनऐवजी सांगाडा पाठवून साडेआठ लाखांची फसवणूक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : ‘स्मॉल बिझनेस करा व पैसे कमवा’ या स्लोगनने जाहिरात देऊन मशिन देतो म्हणून मशिनचा सांगाडा देऊन शंकर फलमारी यांची 8 लाख 32 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीच्या योगेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी शंकर नारायण फलमारी (वय 40, रा. भगवाननगर झोपडपट्टी) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 31 मे 2021 ते 12 डिसेंबर 2022 यादरम्यान आरोपीने एका दैनिकामध्ये ‘स्मॉल बिझनेस करा व पैसे कमवा’ अशी जाहिरात दिली. पत्रावळी, द्रोण, कप, ग्लास, असे डिस्पोजेबल साहित्य घरच्या घरी बनवा व पैसे कमवा, असा उल्लेख त्या जाहिरातीमध्ये होता. या मशिनचे तुम्हाला फक्त 10 टक्केच पैसे भरावे लागतील. उर्वरित 90 टक्के रक्कम आम्ही भरू व तुम्हाला मशिनचा ताबा देऊ, असे सांगितले. त्यामुळे शंकर फलमारी यांनी आरोपीच्या अकौंटवर 5 लाख 45 हजार 600 रुपये भरले.

कच्च्या मालाच्या खरेदीसाठी म्हणून 2 लाख 50 हजार परत भरले तसेच मशिनचा ट्रान्सपोर्ट खर्च 36 हजार 400, असे एकूण 8 लाख 32 हजार रुपये दिल्लीतील संबंधितांनी घेतले. त्यानंतर त्याने मशिनऐवजी फक्त सांगाडा पाठवून फसवणूक केली. या फिर्यादीवरुन दिल्लीच्या योगेश नावाच्या व्यक्तीवर जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Back to top button