

आळंदी : पुढारी वृत्तसेवा; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (दि. 22) प्रस्थान होणार आहे. या प्रस्थानानंतरचा पहिला मुक्काम असलेल्या आजोळघरी माउलींच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. देवस्थानच्या वतीने भाविक ज्याला आजोळघर म्हणतात तो गांधी वाडा काही वर्षांपूर्वी पाडून त्या जागी प्रशस्त असा सभामंडप व दर्शनबारी इमारत उभारण्यात आली आहे. याच दर्शबारीचा हॉल मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथेच पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे.
पावसाचा त्रास मुक्कामाच्या ठिकाणी होऊ नये याकरिता लोखंडी पत्रे वापरून दर्शनबारी मंडपासमोर प्रशस्त मंडप उभारला आहे. मंडपात चारही बाजूंनी प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण मंडप सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे. पोलिसांच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्तांना सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.
पालखी प्रस्थानानंतर आजोळघरी मुक्कामाला राहते. ही परंपरागत चालत आलेली प्रथा असून पालखीचा पहिला मुक्काम श्रीयुत गांधी यांच्या वाड्यात होत असे. कालांतराने येथील जुना मातीचा दगडी वाडा दर्शनबारी व इतर कारणांसाठी पाडावा लागला. तरी येथील रूढ झालेली मुक्कामाची परंपरा विनाखंड सुरू आहे. आजही भक्तांची ओढ पालखी प्रस्थान झाल्यानंतर माउलींच्या दर्शनासाठी आजोळघराकडे लागलेली असते. यंदाही पालखी प्रस्थान झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा घालून आजोळघरी स्थिरावेत. त्यानंतर समाज आरती होऊन दिंड्याही आपापल्या मुक्कामच्या ठिकाणी जातात. दुसर्या दिवशी पहाटे माउली पंढपूरसाठी मार्गस्थ होतात.
हेही वाचा