गोवा : मराठी राजभाषा आंदोलनापासून ‘गोसासे’ दूर का? | पुढारी

गोवा : मराठी राजभाषा आंदोलनापासून ‘गोसासे’ दूर का?

पणजी : पणजी येथील आझाद मैदानावर मराठी राजभाषा व्हावी, या मागणीसाठी मराठी प्रेमींनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील सर्वात जुनी मराठी संस्था असलेल्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाने सहभाग घेतला नाही. त्यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना? असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दै. ‘पुढारी’शी बोलताना पाटील म्हणाले की, गोमंतक साहित्य सेवक मंडळ ही मराठी भाषेच्या समृद्धीसाठी काम करणारी जुनी संस्था आहे. लवकरच या संस्थेला 100 वर्षे होणार आहेत. अशा संस्थेने वा त्यांच्या पदाधिकार्‍यांनी मराठी राजभाषेच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभागी होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संस्थेकडून मराठी राजभाषा व्हावी यासाठीच्या आंदोलनात सहभागी होऊन मराठीसाठी आग्रह धरील, अशी अपेक्षा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पणजीत झालेल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांनी घेतली आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळाने येत्या काळात मराठी राजभाषा व्हावी यासाठी इतर संस्थांसोबत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपल्या मूळ कर्तव्यापासून दूर राहणारे हा द्रोह ठरतो. येत्या काऴात राजकारणी मराठीला सहराजभाषा केल्याचे सांगून मराठी भाषेचा बळी देऊ शकतात. त्यासाठी सर्व मराठीप्रेमींनी सतर्क राहणे गरजेचे असून गोव्यातील मराठी भाषेचा इतिहास व समृद्धी पाहता महाराष्ट्रातील साहित्यिकांचा गोव्यात मराठी राजभाषा व्हावी या मागणीला पूर्ण पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

मराठी आमच्या रक्तात आहे : वंसकर

गोमंतक सहित्य सेवक मंडळ ही संस्था मराठीच्या उत्कर्षासाठीच अनेक वर्षे काम करते. गोव्यात मराठी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आपण आहे. मराठी आमच्या रक्तात आहे. गोव्यात मराठी राजभाषा व्हावी ही आमची मागणी आहे. परवा झालेल्या आंदोलनात काही कारणाने सहभागी झालो नाही. काही सदस्य गोव्याबाहेर होते. आपण कामात होतो. यापुढेही मराठी राजभाषेच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल. त्याबाबत कुणी मनात शंका धरू नये, असे मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी सांगितले.

Back to top button