चाकणच्या कंपनीतील ऑईलसाठ्याला मोठी आग | पुढारी

चाकणच्या कंपनीतील ऑईलसाठ्याला मोठी आग

चाकण : पुढारी वृत्तसेवा: चाकण एमआयडीसीमधील ‘मेटलॉजिक हीट ट्रीटमेंट सोलुशन्स’ या कंपनीच्या ऑईलसाठ्याला 18 जून ला रात्री 11 वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेबद्दल चाकण एमआयडीसी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी सांगितले की, संबंधित कंपनीचे वॉचमन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने या आगीबाबत आम्हाला कळविले. त्यामुळे चाकण केंद्राचा एक अग्निशमन बंब वेळेत घटनास्थळी पोहचला.

ही कंपनी चाकण एमआयडीसीमधील मर्सिडीज बेंझ कंपनीसमोर आहे. कंपनीच्या मोठ्या पत्राशेडमधून आगीच्या धुराचे लोट येत होते. धुराचे लोट बाहेर दूरवर पसरले होते. त्यामुळे बघ्यांची गर्दीसुद्धा जमली होती. कंपनीमध्ये एका 8 बाय 10 फूट आकाराच्या कंटेनरमधील ऑईलसाठ्याला आग लागली होती. त्यातील आगीच्या ज्वाळा सुमारे 15 फूट उंचीवर असलेल्या छतापर्यंत जात होत्या.

घटनेबाबत कळताच महाळुंगे पोलिस चौकीचे पोलिससुद्धा घटनास्थळी तत्काळ पोहचले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात यावी म्हणून सुमारे 45 मिनिटांमध्ये फोमचा वापर केला आणि आग आटोक्यात आणली. आग लागली त्या वेळी कंपनीत कोणीच कर्मचारी नव्हते. त्यामुळे सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा कुणाला दुखापत झाली नसल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांवर इंदापूरला कारवाई

सातारा : पाणी शुध्दीकरणासाठी 139 पथके

कोल्हापूर :‘ओपनबार’ : 7 ठिकाणी छापे; 15 मद्यपी ताब्यात

 

Back to top button