वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांवर इंदापूरला कारवाई | पुढारी

वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांवर इंदापूरला कारवाई

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा: इंदापूर शहरात होणार्‍या बेशिस्त वाहन पार्किंगला आळा घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा पुढे सरसावली असून इंदापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पथक सध्या इंदापूर शहरात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहे.

इंदापूर शहरात रविवारी आठवडे बाजार असल्याने शहरातून जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे दुतर्फा गर्दी होते. या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रविवारी (दि.19) पोलिस जवान अर्जुन नरळे, प्रवीण शिंगाडे, अमोल खाडे आणि सुहास आरणे यांचे पथक दंडात्मक कारवाई करताना दिसून आले. या कारवाईतून सरासरी दैनंदिन 30 ते 35 हजार रुपये दंड वसूल केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रथम अपराधास 500 रुपये, दुसर्‍यांदा तोच अपराध घडल्यास 1 हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कारवाई होऊ नये यासाठी वाहनमालकांनी वाहतुकीच्या रस्त्यावर आपले वाहन नियमबाह्य पद्धतीने उभे करू नये व पोलिस यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे आज राष्ट्रार्पण

बारामतीत उपकंत्राटदारांचा सुळसुळाट

सातारा : रयत साखर कारखान्यासाठी आजपासून धूमशान

Back to top button