सातारा : पाणी शुध्दीकरणासाठी 139 पथके | पुढारी

सातारा : पाणी शुध्दीकरणासाठी 139 पथके

जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि.28 जून ते 4 जुलै असा मार्गक्रमण करणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वारकर्‍यांच्या सेवेसाठी विविध पथके तयार केली आहेत. पाणी शुध्दीकरणासाठी 33 पथके, टँकर फिलिंग पाईंटसाठी 30 पथके, पर्यवेक्षण सनियंत्रणासाठी 2 पथके, 22 फिरती वैद्यकीय पथके व 52 आरोग्य पथके कार्यरत राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लोणंद ते बरड या मार्गावर वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार केला आहे. प्रत्येक दोन दिंड्यांच्या बरोबर एक आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सुक्ष्म नियोजन केले आहे.खंडाळा तालुक्यात पालखी सोहळ्याने प्रवेश केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, पालखीतळ, सईबाई सोसायटी, बाळासाहेबनगर, पाडेगाव, फलटण तरडगाव रोड, खंडाळा चौक या ठिकाणी 18 वैद्यकीय पथके तैनात असून 102 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

फलटण तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव, तरडगाव शाळा, फलटण विमानतळ, प्राथमिक आरोग्य केंद्र बरड, बरड पालखीतळ, काळज, सुरवडी, निंभोरे, तांबमळा, विडणी, पिंपरद, वाजेगाव, साधुबुवाचा ओढा, अशी 34 पथके तैनात राहणार असून 179 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. पाणी शुध्दीकरणासाठी खंडाळा व फलटण तालुक्यात तरडगाव, साखरवाडी, गिरवी, राजाळे, बरड या ठिकाणी 33 पथके कार्यरत राहणार आहेत. त्यासाठी 106 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. टँकर फिलिंग पाईंटसाठी खंडाळा व फलटण तालुक्यात तरडगाव, साखरवाडी, गिरवी, राजाळे, बरड या ठिकाणी 30 पथकांची स्थापना करण्यात आली असून 100 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. फलटण व खंडाळा तालुक्यात 139 पथकांची स्थापना करण्यात आली असून 544 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

तसेच पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी दैनदिन पाणी शुध्दीकरण व सनियंत्रणासाठी लोणंद, तरडगाव, गिरवी, राजाळे, बरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर जबाबदार्‍या देण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Back to top button