नगर : खरीप हंगामासाठी कृषी विभाग झाला सज्ज | पुढारी

नगर : खरीप हंगामासाठी कृषी विभाग झाला सज्ज

राहाता : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात खरीप हंगामात सरासरी 42 हजार हेक्टरवर पेरणी होते. या दृष्टीने शेतकर्‍यांनी जमिनीच्या मशागतीची करून पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी थांबवली आहे. यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मका यांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून उसाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कृषी सेवा केंद्रांमध्ये विविध कंपन्याचे सोयाबीन, मका, बाजरीचे बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे दिसून येते.

मात्र, पावसाच्या अनिश्चिततेमुळे बरेच शेतकरी बियाणे खरेदीस धजावत नाहीत, असे चित्र दिसत आहे, तसेच बर्‍याच शेतकर्‍यांनी घरगुती बियाणे वापरास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. याबद्दल अधिक माहिती देताना पंचायत समिती राहात्याचे गुण नियंत्रक निरीक्षक प्रवीण चोपडे यांनी सांगितले की, तालुका स्तरावरील भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी चालू आहे. तालुक्यामध्ये कृषी सेवा केंद्रांना साठा व भाव फलक दुकानाबाहेर लावण्याबद्दल सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू आजपासून मिळणार

सरळ खातांपासून मिश्र खते कशी बनवावीत, याबद्दल मार्गदर्शनपर बोर्ड बाहेर लावण्यात आलेले आहेत, तसेच बियाणे खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल देखील पोस्टर लावण्याची कार्यवाही सुरू आहे. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या सहकार्याने बियाणे, खते व कीटकनाशके नमुने घेण्यात आलेले असून शेतकर्‍यांनी तक्रार असल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांच्या लिंकिंग, जादा दर विक्री यासंदर्भात तक्रारी आल्यास प्रत्येक गावनिहाय कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत तत्काळ तक्रार निवारण करण्यात येईल.

घरगुती किंवा बाजारातील सोयाबीन बियाणे पेरणी करण्यापूर्वी शंभर बियांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. परवानाधारक विक्रेत्याकडून आजच बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे, घरातील सातबाराधारकाच्या नावाने बियाणे खरेदी करावे. खरेदी केलेल्या अभियानाचे वेस्टन किंवा टॅग, खरेदीचे बिल हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.
तालुक्यामध्ये आज रोजी 3 हजार 797 मेट्रिक टन रासायनिक खते शिल्लक असून त्यामध्ये 1446 मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. तालुक्यासाठी खरीप हंगामाकरीता मंजूर आवंटन 10 हजार 519 मेट्रिक टन इतके आहे.

पक्क्या बिलांसह कीटकनाशके खरेदी करा
कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून पक्क्या बिलासह खरेदी करावी. फवारणी करताना सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले कपडे व साधने सुरक्षा किट घालूनच फवारणी करावी. शिफारशीप्रमाणे औषधांचे प्रमाण घ्यावे. फवारणी करताना अति उन्हात किंवा वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस असलेल्या लेबल क्लेम कीटकनाशकांचा वापर करावा, अशी माहिती गुण नियंत्रक निरीक्षक प्रवीण चोपडे यांनी दिली.

Back to top button