मुंबई : पश्चिम उपनगर ठरवणार पालिकेचा कारभारी!

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
Published on
Updated on

मुंबई : राजेश सावंत

मुंबई महानगरपालिकेतील सत्तेचे गणित पश्चिम उपनगरावर सुरुवातीपासून अवलंबून राहिले आहे. सर्वाधिक 102 प्रभाग असलेल्या या विभागात प्रभागांची संख्या आता 105 झाली आहे. या विभागात ज्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील तोच महापालिकेच्या गादीवर बसेल, हे निश्चित आहे. त्यामुळे या विभागाकडे सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

या विभागात 2017 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्चिम उपनगरात मुसंडी मारण्यासाठी शिवसेनेही स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र मातोश्रीतून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसैनिक संभ्रमात आहेत. असे असले तरी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी झाल्यास या विभागातून सर्वाधिक नगरसेवक जिंकून आणणे शिवसेनेला शक्य आहे.

पश्चिम उपनगरात भाजपचे वर्चस्व आहे. विशेषत: उत्तर मुंबई भाजपचा गड मानला जातो. या विभागात तीन खासदार असून यापैकी दोन खासदार भाजपचे तर एक खासदार शिवसेनेचा आहे. पूर्वी बांद्रा ते जोगेश्वरीपर्यंतचा विभाग काँग्रेसच्या हातात होता. मात्र गेल्या दहा वर्षात या भागात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

दिवंगत सुनील दत्त खासदार असताना येथे काँग्रेससाठी सुगीचे दिवस होते. दत्त यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त यांनी हा विभाग आपल्या हातात ठेवला. मात्र तो फारकाळ टिकवता आला नाही. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत या विभागातून भाजपचे 102 पैकी तब्बल 48 नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे 37, काँग्रेसचे 13 व अन्य चार नगरसेवक निवडून आले होते. प्रभागाची संख्या 9 ने वाढल्यानंतर या विभागात तीन प्रभागांची भर पडली. सध्या या विभागात 105 प्रभाग आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या गादीवर बसण्यासाठी पश्चिम उपनगरात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणे शिवसेना-भाजपासाठी महत्त्वाचे आहे.

या विभागातील नगरसेवक संख्या वाढवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यासाठी स्वतः भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह आमदार पराग अळवणी, राजहंस सिंह, योगेश सागर, अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन अशा दिग्गजांवर जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे या भागातील मराठी मतांची विभागणी करण्यासाठी भाजपा मनसे अस्त्र वापरण्याच्या तयारीत आहे. खार, जोगेश्वरी, अंधेरी, चारकोप, गोराई, आधी मराठी विभाग हेरून येथे वेळ पडल्यास भाजप उमेदवार न देता मनसेला पाठिंबा देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. भाजपच्या तुलनेत शिवसेनेमध्ये मात्र फारशी हालचाल दिसून येत नाही. मुळात निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात स्थानिक शिवसेना नेत्यांना मातोश्रीतूनच स्पष्ट संकेत मिळत नसल्यामुळे हा घोळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने पश्चिम उपनगराची जबाबदारी सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासह रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, संजय पोतनीस यांच्यावर सोपवली आहे. तर काँग्रेसची जबाबदारी संजय निरुपम यांच्यावरदेण्यात येणार असल्याचे समजते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मालाड भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे येथील जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक अजित रावराणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला पश्चिम उपनगर सांभाळताना कठीण जाऊ शकते. शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्यास शिवसेना 50 ते 55 नगरसेवकांपर्यंत मजल मारेल असे सध्याचे चित्र आहे. पश्चिम उपनगरात किमान 70 ते 75 नगरसेवक निवडून यावे, हे भाजपाचे टार्गेट आहे. पण महाविकास आघाडीचा सामना करताना भाजपालाही गाठणे तितकेसे सोपे नाही.

ओबीसींना खुश करण्यासाठी भाजपचे प्रयत्न!

मुंबई महापालिका निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायझाल्यास भाजपने ओबीसी मतदार असलेल्या विभागात ओबीसी उमेदवार देण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या विभागात ओबीसी लोकसंख्या जास्त आहे. याचा अभ्यास करण्यासाठी भाजपची एक टीम कार्यरत आहे. पश्चिम उपनगरात सर्वाधिक प्रभाग असल्यामुळे या विभागात भाजप ओबीसीसाठी किमान 25 ते 30 प्रभाग सोडेल, असे सांगण्यात येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news