संगमवाडी रस्त्यावर वारकर्‍यांचा मार्ग खडतर | पुढारी

संगमवाडी रस्त्यावर वारकर्‍यांचा मार्ग खडतर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसाठी अवघे पाच ते सहा दिवस उरले असतानाही आळंदी रस्त्यावरील संगमवाडीतील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेतच आहे. त्यामुळे लाखो वारकर्‍यांचा मार्ग खडतर असून महापालिका प्रशासनही त्याबाबत अजूनही ढिम्मच आहे.

पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन येत्या बुधवारी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ज्या संगमवाडी मार्गे येणार आहे, त्या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पावसाळा अगदी सुरू झाला असतानाही हे काम सुरू असून त्यामुळे याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यातच आता येत्या बुधवारी या मार्गावरून लाखो वारकरी शहरात येणार आहेत.

असे असतानाही सिमेंट काँक्रिटीकरण्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच सुरक्षिततेच्या अद्याप तरी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वारकर्‍यांसाठी हा मार्ग धोक्याचा ठरण्याची शक्यता आहे. त्यावर आता पुढील चार दिवसात प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संगमवाडीतील पालखी मार्गावरून दहा लाख वारकरी जातात. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे वारकर्‍यांना अपघात होऊन गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. या कामाबद्दल आणि तेथील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही झालेली नाही.

                                    – राज निकम, स्थानिक नागरिक

हेही वाचा 

चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाची चिनी लँडरकडून पुष्टी

दहावी परीक्षेतही सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

सैयामी पुन्हा अभिषेकबरोबर

Back to top button