राज्य मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार होणार परीक्षा | पुढारी

राज्य मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार होणार परीक्षा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमांवर घेतल्या, तर प्रात्यक्षिकांसाठी 40 टक्के अभ्यासक्रम होता. मात्र पुढील वर्षीची 2022-23 या शैक्षणिक वर्षाची दहावी-बारावीची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, दोन वर्षे शाळा सलग सुरू नव्हत्या. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले. मात्र, अपुरी इंटरनेट सुविधा, नेटवर्क नसणे, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसणे अशा विविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आल्या. यावर उपाय म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी करण्यात आला. या इयत्तांच्या परीक्षा उर्वरित 75 टक्के अभ्यासक्रमांवर झाल्या.

बेळगावसह 80 ठिकाणी एसीबीचे छापे

याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून, त्यांचे गुण वाढले आहेत. मात्र पुढील वर्षी दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा या पूर्ण अभ्यासक्रमांवर होणार आहे. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षाही 100 टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने परीक्षेची तयारी करावी, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबतचा अधिकृत निर्णय एससीईआरटीकडून येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे.

यंदाच्या सुविधा पुढील वर्षी नाहीत

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग मंदावला होता. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य मंडळाने विशेष बाब म्हणून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार 15 ते 30 मिनिटांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. मात्र, यापुढे विद्यार्थ्यांना 100 गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी राहणार आहे. उर्वरित विषयांच्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या प्रचलित पद्धतीनुसार वेळ मिळणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

दहावीत सोलापूर जिल्हा पुणे विभागात अव्वल

सोलापूर : वारीनिमित्त विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

श्रीनाथ म्हस्कोबा कार्यस्थळावर विविध उपक्रमांचे आयोजन

Back to top button