भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत चर्चा | पुढारी

भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत चर्चा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या जागी नवीन शहराध्यक्ष नियुक्त होणार असल्याची जोरदार चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी सुरू होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहराध्यक्ष बदलणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही पक्षातील कार्यकर्त्यांचा एक गट बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करीतच होता.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. भाजपच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी शहराध्यक्ष व कार्यकारिणी बदलण्यात येते. राज्यातील या पक्षांतर्गत निवडणुका येत्या दोन महिन्यांत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने शहराध्यक्ष बदलणार की नाही, या बाबत साशंकता आहे.

भाजपने केला वारकर्‍यांचा अपमान : सुनील शेळके

पुण्याबरोबरच मुंबईतील भाजपचे शहराध्यक्ष बदलण्यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पाटील यांनी असे बदल होणार नसल्याचे स्पष्ट करीत चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला. पाटील म्हणाले, ‘मुंबई, पुणे अथवा अन्य कोणत्याही ठिकाणचा शहराध्यक्ष बदलण्याचा प्रस्ताव सध्या नाही.’

मुळीक यांनीही या बातमीचे खंडन केले. ते म्हणाले, ‘माझी जानेवारी 2020 मध्ये शहराध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे येत्या जानेवारीत पदाची तीन वर्षे पूर्ण होतात. शहराध्यक्षपदाच्या कालावधीत मी पुण्यात बूथपातळीपर्यंत सक्षम पक्षबांधणी केली. सर्वांधिक आंदोलने आम्ही केली. कोरोना साथीच्या काळात कार्यकर्त्यांच्या मदतीने नागरिकांना साह्य केले.’

मुळीक यांनी आमदार असताना वडगाव शेरी मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत अधिक संख्येने नगरसेवक निवडून आणले. त्यांचे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांशी संबंध चांगले आहेत. मात्र, ते मितभाषी आहेत. फारसे आक्रमक नाहीत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ता टिकविण्यासाठी भाजपला शहरात सर्वत्र परिचित असलेला व पक्षाची बाजू जोरकसपणे मांडणारा चेहरा शहराध्यक्षपदी हवा असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे.

लोणावळा :लोकअदालतीमध्ये 422 दाखलपूर्व प्रकरणे निकाली

चर्चेतील नावे विचारात घेतल्यास, मोहोळ यांना गेल्या पाच वर्षांत महापौर व स्थायी समितीचे अध्यक्ष असे सत्तेची साडेतीन वर्षे पद मिळाले. ते लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करीत असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. शिरोळे हे त्यांच्या शिवाजीनगर मतदारसंघात कार्यक्षम आमदार म्हणून कार्यरत आहेत. बिडकर यांनी सभागृह नेते म्हणून पक्षासाठी चांगली कामगिरी केली आहे.

मात्र, प्रदेशातील पक्षश्रेष्ठी व शहरातील वरिष्ठ नेते यासंदर्भात कोणती भूमिका घेणार, ते महत्त्वाचे ठरणार आहे. प्रदेशातील नेते सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीत गुंतलेले आहेत. निवडणूक झाल्यानंतरच राज्यातील काही ठिकाणी पक्षातील स्थानिक नेतृत्वात बदल करायचे की नाही, याची चर्चा होण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

 

हेही वाचा

पिंपरी : शिवसेनेचे ओझे राष्ट्रवादी खांद्यावर घेणार का?

राज्यात रविवारपासून मुसळधार

धुळे : तापी नदीत उडी टाकून माय-लेकाची आत्महत्या

Back to top button