पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पीक विमा कंपन्यांची मागील पाच वर्षांची श्वेतपत्रिका काढावी आणि विमा कंपन्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केली.
कृषी आयुक्तालयासमोर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी तुपकर म्हणाले, पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यांनी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा या कंपन्यांना फायदा झाला. कारणे सांगून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे विमा प्रस्ताव नाकारले जात आहेत.
विमा कंपन्यांनी गेल्या वर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही. त्याचबरोबर या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान २५ टक्के नुकसानीची आगाऊ रक्कम दिली पाहिजे.
केंद्र सरकारच्या तशा सूचना आहेत. मात्र विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांचे साटेलोटे आहे.
विमा कंपन्यांकडून गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी.
शेतकऱ्यांना पीक विमा येत्या १५ दिवसांत मिळाला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुण्यात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राज्य सरकारला जागे करणारे हे आंदोलन असेल आणि संपूर्ण राज्यातील शेतकरी आंदोलनांसाठीं एकवटतील, असेही ते म्हणाले.
पहा व्हिडिओ :