धुळे : ‘बंदिवानांनी तुरूंगवासानंतर जीवनात आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्‍न करावा’ | पुढारी

धुळे : 'बंदिवानांनी तुरूंगवासानंतर जीवनात आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्‍न करावा'

धुळे ; पुढारी वृत्तसेवा :  धुळे जिल्हा कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या तुरुंगात स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, जमनललाल बजाज, साने गुरुजी यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यांचा आदर्श घेत बंदिवानांनी तुरुंगवासानंतर जीवनात आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास, बंदरे आणि विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हा नियोजन समिती यांच्याकडील मंजूर अनुदानातून जिल्हा कारागृह वर्ग एक येथील बंदिवानांसाठी स्वयंपाकगृहात भोजन सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्राप्त यंत्रसामग्रीचा उदघाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री  सत्तार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, त्‍याग केला त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले.

या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांपैकी काही जणांना याच कारागृहात बंदिवान म्हणून ठेवण्यात आले होते.

बंदिवानांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

कारागृहातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

बंदिवानांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी.

बंदिवानांच्या तक्रारी विहित कालावधीत सोडविण्यात याव्यात. तसेच बंदिवानांनी गुन्हेगारीमुक्त होवू असा निर्धार करावा, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले.

कारागृह अधीक्षक गायकवाड यांनी सांगितले की, धुळे जिल्हा कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच कारागृहात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या बंदिवानांना ठेवण्यात आले होते.

कारागृहातील बंदिवानांसाठी अद्ययावत स्वयंपाक गृह कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वीच कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

प्रारंभी पारिजात चव्हाण, गायत्री चव्हाण यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. तुरुंगाधिकारी श्रीकृष्ण भुसारे, नेहा गुजराथी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी केली कारागृहातील स्वयंपाकगृहाची पाहणी 

पालकमंत्री सत्तार यांनी तुरुंगातील विविध कक्षांना भेटी देत आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड,

सानेगुरुजी यांना अभिवादन केले. तसेच त्यांनी स्वयंपाक गृहाला भेट देवून पाहणी करीत तेथील भोजनाचा आस्वाद घेतला.

Back to top button