राडारोडा टाकणार्‍या विकसकाला दंड; मधुकोष सोसायटीची आयुक्तांकडे तक्रार | पुढारी

राडारोडा टाकणार्‍या विकसकाला दंड; मधुकोष सोसायटीची आयुक्तांकडे तक्रार

सिंहगड रोड/किरकटवाडी : धायरी फाट्याजवळ असणार्‍या मधुकोष सोसायटीसमोर अनधिकृतपणे राडारोडा टाकणार्‍या खासगी विकसकाला पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्वरित राडारोडा हटविण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वी खासगी विकसकाने धायरीतील रायकरनगर येथून राडारोडा अनधिकृतपणे आणून टाकला होता.

यासंबंधी मधुकोष सोसायटीने देखील यावर आक्षेप नोंदविताना हा राडारोडा उचलण्यात यावा, यासंबंधी थेट आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेताना सिंहगड क्षेत्रीय कार्यालयात संबंधित खासगी विकसकाकडे हा राडारोडा उचलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, राडारोडा उचलण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कारण विकसकाकडून देण्यात येत होते.

मोकळ्या जागा बनतात रात्रीच्या वेळी ‘ओपन बार’; व्हाइट कॉलर गुंडांचा धुमाकूळ

दै. ‘पुढारी’ने याबाबत सहायक आयुक्तांशी संवाद साधत ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी पुढाकार घेत राडारोडा उचलण्याचे आदेश खासगी विकसकासह संबंधित अधिकार्‍यांना दिले. सध्या राडारोडा हटविण्याचे काम सुरू असून, खासगी विकसकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पाणी तुंबण्याची शक्यता

मागील वर्षी झालेल्या पावसाने मधुकोष सोसायटीसमोरच्या भागात पाणी साचून स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने भूमिगत चेंबरची निर्मिती केली होती. त्याच सगळ्या चेंबरवर विकसकाने राडारोडा टाकल्याने पुन्हा एकदा मागील वर्षीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिकेचे अधिकारी विकसकाला हाताशी धरून हा राडारोडा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

खासगी विकसकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, आगामी दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास जाईल.

                 – प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

ओढे-नालेसफाईला शेवाळवाडीत सुरुवात

तिने छंदातून जगण्याचा मार्ग केला यशस्वी

हडपसर उड्डाणपुलाखालील दुभाजक धोकादायक

Back to top button