वटपौर्णिमेला विधवांना दिला हळदी-कुंकवाचा मान | पुढारी

वटपौर्णिमेला विधवांना दिला हळदी-कुंकवाचा मान

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वटपौर्णिमेनिमित्त आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा महिलांना हळदी-कुंकवाचा मान देऊन त्यांचा सन्मान केला. विधवा होण्यात महिलांची काहीच चूक नसते. आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या घरातील सर्व जबाबदारी अत्यंत चोख बजावत असतात.

परंतु, एखाद्या शुभकार्यात किंवा महिलांच्या हळदी-कुंकवासारख्या कार्यक्रमाला समाजात अशा महिलांना मानसन्मानापासून दूर
ठेवले जाते. बदलत्या काळात अशा अंधश्रद्धांना मूठमाती देऊन सर्व महिलांचा मानसन्मान राखण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत धालेवाडीने वटपौर्णिमेच्या दिवशी अशा सर्व महिलांच्या मनातील शंका दूर करून हळदी-कुंकू कार्यक्रम केला. या वेळी सर्व महिलांचा गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी सरपंच शरद काळाणे, उपसरपंच रोहिदास गायकवाड, सदस्य प्रभाकर भालेराव गुरुजी, रंभाई शिंपीण ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत काळाणे, ह्युमन राइट्सचे सचिव कैलास काळाणे, रामदास काळाणे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते विकास काळाणे, हेमंत काळाणे, प्रदीप कदम, त्याचप्रमाणे अनेक महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच अंकिता काळाणे, सदस्या वंदना काळाणे, ग्रामसंघ अध्यक्षा सारिका काळाणे व महिला गटांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा

पिंपरी :हाऊसिंग सोसायटीच्या ड्रेनेजलाइनसाठी महापालिकेचा खर्च

पाठदुखीने त्रस्त आहात?

प्रसूतीनंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी

Back to top button