प्रसूतीनंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी | पुढारी

प्रसूतीनंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी

काही घरगुती उपायांनी पोट कमी करू शकता. आई आणि बाळ दोघांच्या द़ृष्टीने हे उपाय सुरक्षित असतात आणि परिणामकारकही असतात. अर्थात, हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला जरुर घ्यावा.

गर्भावस्थेत पोटाचा आकार वाढतो; मात्र प्रसूतीनंतरही बर्‍याच स्त्रियांमध्ये वाढलेले पोट तसेच राहते. गर्भावस्थेत वाढलेले वजन आणि पोट कमी करणे अवघड होते. कारण, प्रसूतीनंतर स्त्रीला थोडा अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे प्रसूतीनंतर ताबडतोब व्यायाम करणेही शक्य नसते आणि पोट कमी करण्यासाठी घाईही करू नये. एखाद्या औषधाचा वापर करून वजन कमी करण्याचा प्रयत्न चुकूनही करू नये. कारण, या गोष्टींचा बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मात्र, काही घरगुती उपायांनी पोट कमी करू शकता.

आई आणि बाळ दोघांच्या द़ृष्टीने हे उपाय सुरक्षित असतात आणि परिणामकारकही असतात. अर्थात, हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला जरुर घ्यावा. मेथीचे दाणे पोट कमी करण्यासाठी उपकारक ठरतात. महिलांमध्ये हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठीही ते उपयुक्त ठरतात. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. रात्री 1 चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात उकळावेत. कोमट झाल्यावर हे पाणी प्यावे. पोट लवकर कमी होईल.

बाळाला स्तनपान करावे. एका अभ्यासानुसार स्तनपान केल्याने शरीरातील चरबी, पेशी आणि कॅलरीज दोन्हींचे मिळून स्तनाची निर्मिती करते. त्यामुळे कोणतीही विशेष मेहनत न घेता पोट आणि वजन कमी होते. प्रसूतीनंतर फक्त गरम पाणी प्यावे त्यामुळे पोट कमी होतेच, पण वजन वाढण्यास अटकाव होतो.

आपल्या पोटाला गरम कापड किंवा कापडी पट्टा लपेटून ठेवावा. त्यामुळे पोटाचे आकारमान योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे गर्भावस्थेनंतर होणार्‍या कंबरदुखीतही आराम मिळतो. गर्भावस्थेनंतर पोट कमी करण्यासाठी दालचिनी आणि लवंग खूप उपयुक्त ठरते. त्यासाठी 2-3 लवंग आणि अर्धा चमचा दालचिनी उकळून ते पाणी थंड करून प्यावे. त्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टीदेखील वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही खूप असते. तसेच आई आणि बाळ यांच्या आरोग्याला त्यापासून कोणतेही नुकसानही होत नाही, तसेच वजनही सुरक्षितपणे कमी होते. अर्थात, हे उपाय सरसकट लागू होत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच हे उपाय करावेत.

-डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button