

वेल्हे : दत्तात्रय नलावडे : पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या पानशेत-वरसगाव धरण क्षेत्रात ऐन पावसाळ्यातच कडकडीत उन्हाळा आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणी साठ्यात दर तासागणिक घट सुरू आहे. पावसाने ओढ दिल्यास पुणेकरांसमोर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे. सोमवारी (दि. 13) दिवसअखेर खडकवासला धरणसाखळीत 4.26 टीएमसी म्हणजे अवघे 14.61 टक्के पाणी होते.
गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास निम्मा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 13 जून 2021 रोजी साखळीत 6.70 टीएमसी म्हणजे 22.98 टक्के पाणी होते. धरण क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पुणेकरांची चिंता वाढणार आहे. शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणीही या आठवड्यात 17 जून रोजी बंद करण्यात येणार आहे. जोरदार पाऊस पडणार्या रायगड जिल्ह्यालगतच्या वरसगाव-पानशेत धरण खोर्यासह खडकवासला साखळीतील टेमघर, खडकवासला या चारही धरण क्षेत्रात मान्सूनच्या पावसाचा थेंबदेखील पडला नाही. दोन दिवसांपासून पावसाचे ढग गायब होऊन उन्हाळा सुरू झाला आहे.
जोरदार पाऊस पडणार्या पानशेत खोर्यात 1 जूनपासून 13 जूनपर्यंत अवघा 20 मिलिमीटर पाऊस पडला. याच कालावधीत वरसगाव येथे 22, टेमघर येथे 7 मिलिमीटर पाऊस पडला, तर खडकवासलात पावसाचा थेंबही पडला नाही.
शेतीचे पाणी बंद झाल्यानंतर खडकवासलातून केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाने ओढ दिली तरी 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा राखीव ठेवला आहे. 15 जुलैनंतर धरणसाखळीतील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. तोपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही.
– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग