सलमानला धमकीची मला कल्पना होती; महांकाळने दिली कबुली

सलमानला धमकीची मला कल्पना होती; महांकाळने दिली कबुली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'अभिनेता सलमान खान याला बिष्णोई टोळीकडून धमकीचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती होती,' अशी कबुली सौरभ महांकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे याने पुणे पोलिसांना दिली आहे. त्याच्याकडे पंजाब, तसेच मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे.लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक सध्या दिल्लीत असून, ते बिष्णोईकडे चौकशी करणार आहे. तसेच, संतोष जाधव याच्याकडेही बिष्णोई टोळीशी त्याचा कसा संबंध आला, याचा तपास केला जाणार आहे. सौरभ महांकाळला गेल्या आठवड्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून पकडले. गेले चार दिवस त्याच्याकडे पंजाब, मुंबई पोलिसांबरोबरच ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली.

त्यात त्याने पंजाब, हरियाणा येथे रेकी केल्याचे सांगितले. तसेच राजस्थान, दिल्ली येथे संतोषसोबत काम केल्याचे तो सांगतो. सलमान खान याच्या धमकीपत्राबाबत आपल्याला माहिती असल्याचेदेखील तो पोलिसांना म्हणाला. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा विक्रम बरार याच्याशी महांकाळचा संतोषमार्फत संपर्क होता. महांकाळने दिलेली माहिती पडताळून पाहण्यात येणार आहे. त्यातून संतोष व इतरांचा मुसेवाला हत्येप्रकरणी किती संबंध होता, यावर अधिक प्रकाश पडणार आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित 7 ते 8 प्रकारची माहिती हाती आली आहे. त्याचा तपास सुरू आहे.

टोळी संपूर्ण देशात सक्रिय

बिष्णोई टोळीचे शार्प शूटर देशभरात पसरलेले आहेत. सातशेपेक्षा अधिक सदस्य या टोळीत आहेत. त्यात अनेक जण एकमेकांना ओळखतही नाहीत. त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क आहे. अन्य राज्यांतील पोलिस दलाशी समन्वयातून याची माहिती पोलिस घेत आहेत. महांकाळ हा इन्स्ट्राग्राममार्फत बिष्णोई टोळीशी संपर्कात होता. त्यावरून पोलिसांना विविध प्रकारची माहिती मिळू लागली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुसेवाला हत्येची घटना पंजाबात घडली असली, तरी मीडियातील बातमीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यातील संशयित तिघांना आतापर्यंत पकडले आहे.

25 तास प्रवास करून पुण्यात आणले

शनिवारी रात्री संतोष जाधव व सूर्यवंशी याला मांडवी येथे पकडण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी दोघांना वेगवेगळ्या गाडीतून 25 तास प्रवास करून रविवारी रात्री पुण्यात आणले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news