मुंबई : पुढारी वृत्तसेवा उपनगरीय रेल्वे मार्गावरील एमयूटीपी प्रकल्पाचे काम सुरु राहण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आणखी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुप्ता यांनी दिली.
रेल्वे मंत्रालयाकडून आणखी 100 ते 200 कोटी रुपये निधी मिळण्याचीही आशा असून, राज्य सरकारशीही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. गेल्या महिन्याभरात राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय आणि सिडकोकडून एमआरव्हीसीला असे 425 कोटी रुपये मिळाले. मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर एमयूटीपी अंतर्गत विविध रेल्वे प्रकल्प राबविण्यात येते आहेत. यामध्ये एमयूटीपी 2 मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा, सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, तर एमयूटीपी 3 मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, 47 एसी लोकल अशा प्रकल्पांचा समावेश आहे.
एमयूटीपी प्रकल्पांमध्ये 51 टक्के निधी रेल्वेकडून आणि 49 टक्के निधी राज्य सरकार देते. रेल्वेने 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आतापर्यंत दिला. राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात एक हजार कोटी रुपयाचा निधी थकवला होता. राज्य सरकारशी अनेकदा चर्चा झाल्यानंतर एमएमआरडीएमार्फत एकूण 300 कोटी रुपयांचा निधी, तर सिडकोकडून 25 कोटी रुपये निधी एमआरव्हीसीला मिळाला. अजून 700 कोटी रुपये राज्य सरकारकडे बाकी आहेत.
हेही वाचा