मुसेवाला हत्त्या प्रकरण : पोलिसांनी सांगितला संतोष जाधवच्या अटकेचा थरार

संतोष जाधव
संतोष जाधव
Published on
Updated on

पुणे / मंचर : पुढारी वृत्तसेवा

पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर गुजरात राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. मुसेवाला यांच्या खुनानंतर संतोष जाधव, सौरभ महाकाल यांचा त्यात सहभाग असल्याचा मीडिया रिपोर्ट आल्यानंतर त्या आधारे पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास करून त्यांना अटक केल्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनीसोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

एका खून प्रकरणात वॉंटेड असलेला आणि मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असलेला संतोष जाधव हा काही महिन्यांपासून फरार होता. संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी या तिघांचे लॉरेन्स बिष्णोई गॅंगसोबत संबंध असल्याचे उघड झाले आहे. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती. काही दिवसांपूर्वीच साैरभ महाकाल याला अटक करण्यात आली होती, तर नवनाथ सूर्यवंशी यालाही अटक करण्यात आली असल्याचे कुलवंत कुमार यांनीसांगितले.

संतोष आंबेगाव तालुक्यातील मंचरचा रहिवासी

संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असून तो गेल्या दीड वर्षांपासून मंचर येथील राण्या उर्फ ओंकार बाणखेले या गुन्हेगाराचा खुन प्रकरणी फरार आरोपी होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा गेल्या दीड वर्षापासून जाधव याचा शोध घेत होते. परंतु जाधव हा पोलिसांना सापडत नव्हता. पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव याचे नाव आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभाग त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधुन संतोष जाधव याला रविवार रात्री अटक केली. पुणे जिल्हा पोलिस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली

सुर्यवंशी सापडला आणि माग मिळाला

संतोष हा बिष्णोई टोळीचा पुण्यातील म्होरक्या आहे. गोल्डी ब्रारच्या माध्यमातून संतोष जाधव लॉरेन्स बिष्णोईशी संपर्कात. तर महाकाळ हा जाधवच्या माध्यमातून संपर्कात होता. राजस्थान, हरियाणा, पंजाब येथे दोघांनी रेकी केली.  संतोष जाधव हा गुजरातला त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशी याच्याकडे जाऊन लपला होता. पुणे ग्रामीण पोलीसांची टीम गुजरातमधील भुज जिल्ह्यातील मांडवी गावात पोहचली. तिथे त्यांना नवनाथ सूर्यवंशी सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आधी माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलीसांनी त्यांच कौशल्य वापरल्यावर त्याने संतोष जाधवला मांडवी गावाजवळील नागोर गावात लपवलं असल्याच सांगितल.

संतोष जाधवला वेगळी खोली घेऊन देण्यात आली होती. तिथे त्याच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. ओळख लपविण्यासाठी संतोष जाधवने डोक्याचे टक्कल केले होते. त्याचबरोबर त्याने त्याचा पेहराव देखील बदलला होता. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांनी त्याला तो रहात असलेल्या ठिकाणी छापा टाकून पकडले. संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे हे लॉरेन्स बिष्णोई टोळीत सहभागी झाले होते. मात्र सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवचा काय रोल होता हे याचा तपास केला जाणार आहे.

गुजरात आणि दिल्लीतही तपास

गुजरात बरोबरच दिल्लीतही पुणे ग्रामीण पोलीसांच्या टीम्स संतोष जाधवचा शोध घेत होत्या. सलमान खानला देण्यात आलेल्या धमकी बाबत सिद्धेश कांबळे ला माहिती होती. नवनाथ सुर्यवंशी हा सातारा जिल्ह्यातील वडूजचा राहणारा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो गुजरातमधे काम करतो. संतोष जाधवच्या तेजस शिंदे या साथीदाराचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रातील आणखीही काही तरुण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहेत. हे तरुण सोशल माडीयाच्या माध्यमातून बिष्णोई टोळीकडून प्रभावित झालेत आणि गुन्हेगारीकडे ओढले गेले आहेत. त्याचबरोबर हे तरुण संपर्कासाठी इन्स्टाग्राम कॉल सारख्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करताहेत.

सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीची माहिती सिद्धेश कांबळेने दिली. त्या माहितीची खातरजमा केली जात आहे. त्यासाठी पुणे पोलीसांची एक टीम दिल्लीत लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करण्यासाठी उपस्थित आहे. सिद्धू मुसेवाला आणि सलमान खानला देण्यात आलेल्या धमकी मधे संतोष जाधवचा काय रोल आहे याचा याचाही तपास करण्यात येणार आहे. संतोषच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक तरुण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहेत. दरम्यान, दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी पुण्यात येऊन या प्रकारणाची संपूर्ण महिती घेतली असून, तिघांचा सहभाग मुसेवाला खून प्रकरणाशी आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सूर्यवंशी आणि जाधवला २० जूनपर्यंत कोठडी

या दोघांना रविवार रात्री बारा वाजता पुणे येथील शिवाजीनगर मोक्का न्यायालयात न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. दीड वर्षांपासून फरार असलेला संतोष जाधव हा राण्या बाणखेले या गुन्हेगाराचा खुन प्रकरणी फरार झाल्यानंतर त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता. राण्या बाणखेले खून प्रकरण व संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येबाबत संतोष जाधव यांच्याकडून पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news