पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'अनिल गुंजाळ यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे,' असे मत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना व पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य परीक्षा परिषदेचे सहायक आयुक्त अनिल गुंजाळ यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या वेळी काळे बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, पुणे माध्यमिक शिक्षकेतर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष प्रसन्न कोतुळकर आदी उपस्थित होते.
काळे म्हणाले, 'शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली, ज्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळाली, दहावी – बारावीत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना गुंजाळ यांनी सतत मार्गदर्शन केले.
ज्यामुळे अनेक विद्यार्थी आजदेखील विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. यातील कित्येक विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष भेटले देखील नाहीत, परंतु फोनवरून त्यांचे समुपदेशन करून त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला.' देशमुख म्हणाले, 'शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी गुंजाळ यांच्यासारखे अधिकारी असणे आवश्यक आहे.' खांडेकर म्हणाले, काम करत असतानाचा सकारात्मक दृष्टिकोन, नेहमीच विद्यार्थी हित समोर ठेवून त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हा सर्वांना कायम आठवणीत राहील असे सांगितले. कोतुळकर यांनी आभार मानले.
हेही वाचा