

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'काश्मिरात वर्षोनुवर्षे असलेले अस्तित्व संपत चालल्याच्या निराशेतून हताश झालेल्या दहशतवाद्यांनी काश्मीर खोर्यात 'टार्गेट किलिंग'चा प्रकार सुरू केला आहे,' असे मत माजी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. सरहद पुणेच्या वतीने 11 ते 15 जूनदरम्यान पहिल्या जम्मू-काश्मीर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याच्या उद्घाटन प्रसंगी जावडेकर बोलत होते. नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुध्दे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी जावडेकर व जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अध्यक्ष सईद मोहम्मद अल्ताफ बुखारी यांच्या हस्ते मुश्ताक छाया व प्राण किशोर कौल यांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणेरी पगडी, उपरणे, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सरहदचे संजय नहार, नीलेश नवलाखा, युवराज शहा आदी उपस्थित होते. बुखारी म्हणाले, 'स्वातंत्र्यावेळी भारतातील मुस्लिमांकडे पर्याय नव्हता. पण, काश्मीरमधील मुस्लिमांकडे तो होता. काश्मिरींनी स्वत:हून भारताचा पर्याय निवडला. काश्मीरमधील सध्याच्या स्थितीसाठी मी आमच्या इतिहासाला नाही, तर भौगोलिक स्थानाला दोष देईन. आमचा इतिहास समृद्ध आहे.
मात्र, आम्ही अशा स्थानी आहोत, की ज्या भागापासून जगाला धोका असल्याची भीती वाटते. याच सावटाखाली आम्ही जगत आलो आहोत. त्यातूनच आम्ही घडलो. पण, आम्हाला कुणी मदतीचा हात दिला, तर आम्ही काश्मीरचेच नव्हे, तर भारताचेही नाव उंचावू.
या वेळी 'जीवनगौरव' पुरस्कारप्राप्त व विशेष सन्मानित मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान शमीम अख्तर व सहकार्यांनी सादर केलेल्या अभंग, लावणी, कव्वाली व काश्मिरी गीताला नागरिकांनी टाळ्यांच्या गजरांनी दाद दिली.
जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे बुखारी म्हणाले, 'आम्हीही माणूस आहोत. आमच्याही मनात तुमच्याप्रमाणे भावना, ऊर्मी आहे. आम्हाला समान संधी द्यावी. देशातील इतर नागरिकांप्रमाणे वागणूक द्यावी. आमच्याकडे समान सांविधानिक अधिकार आहेत. मात्र, आम्हाला त्याची जाणीवही होऊ दिली जात नाही.'
हेही वाचा