सादलगाव येथे वादळी वार्‍याने शेतकर्‍याच्या घराचे पत्रे उडाले | पुढारी

सादलगाव येथे वादळी वार्‍याने शेतकर्‍याच्या घराचे पत्रे उडाले

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा: सादलगाव (ता. शिरूर) परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने नुकतीच हजेरी लावली. वादळी पावसाचा तडाखा बसून सादलगाव येथील शेतकर्‍याच्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यात पूर्व भागात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. अचानक ढग दाटून आल्यानंतर पावसासह वार्‍याचे प्रमाण मोठे होते.

या पावसाने सादलगाव येथील बबन पुनाजी पवार यांच्या राहत असलेल्या घरावरील पत्रे जोरदार वार्‍याच्या प्रवाहाने उडून गेले आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित घराचा पंचनामा तलाठी एस. एम. घाडगे यांनी केला आहे. एकूण नुकसान एक लाख दहा हजार रुपये झाल्याचे तलाठी घाडगे यांनी सांगितले.

दरम्यान, पूर्व भागात अनेक शेतकरी तरकारी पिके मोठ्या प्रमाणावर घेत असतात. टोमॅटो या पिकाला आधार देण्यासाठी लावलेले बांबू अनेक ठिकाणी वाकले असून, पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याने उभा ऊस, मका ठिकठिकाणी पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. पहिल्याच पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला असला, तरी नुकसानीची झळदेखील सोसावी लागत आहे.

हेही वाचा

खरेदी-विक्रीत 14 लाखांची फसवणूक भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

आंबेगावच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस; शेतीची कामे ठप्प

पिंपरखेड परिसरात जोरदार पाऊस, पिके भुईसपाट

Back to top button