Monsoon Update : अखेर मान्सून तळकोकणात दाखल, पुढील ४८ तासांत महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती | पुढारी

Monsoon Update : अखेर मान्सून तळकोकणात दाखल, पुढील ४८ तासांत महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात रेंगाळलेला मान्सून कोकणातील काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनने आज महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत धडक दिली आहे. मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी भाग, संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकचा आणखी काही भाग व्यापला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूर्ण कर्नाटक व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्याच्या सीमेवर गेला आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून अखेर दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे कोकणात दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो एक जूनला केरळमध्ये येतो. यंदा मात्र तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याने महाराष्ट्रातही तो वेळेआधी पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र, आपल्या लहरी स्वभावाची चुणूक त्याने दाखवून दिली आणि त्याची पावले मंद पडू लागली. महाराष्ट्राच्या सीमेवर तो सुमारे आठवडाभर थांबला. त्यामुळे आणखी काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत असतानाच त्याने पुन्हा पुन्हा सर्वांना झुकांडी दिली होती. आता तो कोकणात सरकला आहे.

दरम्यान, पुढील ५ दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील ५ दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या २४ तासांत सिक्कीम, आसाममधील काही भागांत तसेच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आणि मराठवाड्यातील एक ते दोन भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पडला असल्याची माहिती खासगी हवामान संस्था स्कायमेटने (Skymet) दिली आहे.

Back to top button