पुण्यातील निवडणुकीचा रंग एमआयएम बदलणार

पुण्यातील निवडणुकीचा रंग एमआयएम बदलणार

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : हैदराबाद येथील ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या राजकीय पक्षाने गेल्या दशकात महाराष्ट्रासह देशाच्या सर्व भागांत पोहोचण्यास प्रारंभ केल्याने, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. पुण्याच्या महापालिका निवडणुकीतही एमआयएम ताकदीने उतरण्याच्या तयारीला लागले आहे. त्याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना कमीअधिक प्रमाणात बसू शकतो.

पुण्यातील 14 प्रभागांत निवडणूक जिंकण्याच्या तयारीने उतरण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. वडगाव शेरी, हडपसर, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. बैठका, मेळावे, बूथरचना या माध्यमातून त्यांनी सर्व प्रभागांत पक्षबांधणीवर जोर दिला आहे. अन्य राजकीय पक्षांतील काही जण निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच एमआयएमच्या स्थानिक नेत्यांनी केले.

आंध— प्रदेश-तेलंगणातील एमआयएमने पहिल्यांदा महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर बिहारमध्ये त्यांचे पाच आमदार निवडून आले. गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू येथील महापालिका निवडणुकीत त्यांनी काही जागा जिंकल्या. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांचे प्रत्येकवेळी दोन आमदार निवडून आले. राज्यातील नऊ महापालिकांत एमआयएमचे 62 नगरसेवक आहेत. औरंगाबादला पाच वर्षांपूर्वी 25 जागा जिंकत मुख्य विरोधी पक्षनेत्याची जागा मिळविली. तिथे शिवसेनेने 29, तर भाजपने 22 जागा जिंकल्या होत्या.

एमआयएमचे हैदराबादनंतर प्रथमच देशातील दुसरे खासदार इम्तियाज जलील औरंगाबादहून निवडून आले. त्यापूर्वी ते भाजप व शिवसेना यांच्यातील मतविभागणीमुळे 2014 मध्ये औरंगाबादमधून आमदार झाले होते. तसाच फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळीही झाला. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी झाली होती. इम्तियाज जलील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पूर्वी पुण्यात एका वृत्तवाहिनीचे पत्रकार म्हणून कार्यरत होते.

पुण्यात एमआयएमने पहिल्यांदा 2015 मध्ये कोंढव्यात पोटनिवडणूक लढविली. 2017 मध्ये त्यांनी महापालिकेच्या 23 जागांवर निवडणूक लढविली. येरवड्यातून एमआयएमच्या अश्विनी डॅनियल लांडगे निवडून आल्या. या प्रभागात दोन जागी त्यांचे उमेदवार शिवसेनेनंतर दुसर्‍या क्रमांकावर होते. त्यांची दुसरी महिला उमेदवार साडेसातशे मतांनी पराभूत झाली होती. महापालिकेत प्रवेश केल्यावर एमआयएमने 2019 मध्ये वडगाव शेरी, हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.

मुस्लिम उमेदवारांबरोबरच दलित, मराठा, ख्रिश्चन समाजाच्या उमेदवारांनाही एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाते. त्यांचा फायदा वस्तीपातळीवरील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होतो. कोंढवा, येरवडा, रविवार पेठ, मंगळवार पेठ, भवानी पेठ, मोमीनपुरा, कासेवाडी अशा मुस्लिम वस्ती अधिक असलेल्या ठिकाणी एमआयएमचे अस्तित्व जाणवते.

एमआयएमचे शहराध्यक्ष शाहीद जावेद शेख यांच्या सांगण्यानुसार, पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात 14 प्रभागांत ते जिंकू शकतात. सध्या त्यांचा नगरसेवक ख्रिश्चन आहे. त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत अनेक जागांवर ते दलित उमेदवारांना संधी देणार आहेत. त्यामुळे एमआयएमचे नगरसेवक यंदा वाढणार आहेत.

वडगाव शेरी मतदारसंघात प्रभाग क्रमांक दोन, सात, आठ, नऊ, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये प्रभाग 19 व 27, कसबा पेठ मतदारसंघात प्रभाग क्रमांक 18, तसेच 28 व 29, हडपसर मतदारसंघातील 41 ते 43, तसेच 47 व 58 या चौदा प्रभागांत निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी एमआयएमने केली आहे. अन्य प्रभागांतही काही जागा लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अन्य पक्षांतील मातब्बर इच्छुक शेवटच्या टप्प्यात एमआयएमकडे येण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या वाढत्या अस्तित्वाचा फटका अनेक मोठ्या उमेदवारांना व पक्षांना बसू शकतो. त्यामुळे एमआयएमच्या हालचालीकडे विरोधकांची नजर लागली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news